भुसावळातील वर्दळीच्या शिव कॉलनीत एकाचवेळी चार बंद घरे फोडली
लाखो रुपयांचा ऐवज लंपास : कुटूंब बाहेगावी गेल्याने चोरट्यांनी साधली संधी : पोलिसांना तक्रारदाराची प्रतीक्षा
Four locked houses were broken into simultaneously in the bustling Shiv Colony of Bhusawal भुसावळ (16 जून 2026) : शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाजवळील अत्यंत गजबजलेल्या भागातील शिव कॉलनीत सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी चार बंद घरांना टार्गेट करीत धाडसी घरफोडी केली. तीन घरांमध्ये चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसलेतरी एका घरातून चोरट्यांनी सुमारे 70 हजारांची रोकड तसेच 28 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवल्याची माहिती आहे. तक्रारदार पोलीस ठाण्यात आले नसल्याने या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शहरातील वाढत्या चोर्या-घरफोड्यांमुळे नागरिक धास्तावले आहेत.
एकाचवेळी चार घरे टार्गेट
सूत्रांच्या माहितीनुसार, जामनेर रोडवरील शिवकॉलनीत प्रमोद भास्कर भंगाळे हे पत्नी मंगला भंगाळेंसह वास्तव्यास असून ते जळगावच्या जिल्हा माहिती कार्यालयात रिन्व्यू ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी हे दाम्पत्य पंढरपूर दर्शनासाठी गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातील सुमारे 70 हजारांची रोकड तसेच पाच ग्रॅमच्या एकूण चार अंगठ्या, तीन ग्रॅमची एक अंगठी तसेच पाच ग्रॅमचा एक कॉईन चोरट्यांनी लांबवला.
पेपर आणण्यासाठी गेल्यानंतर घरफोडी उघड
भंगाळे यांच्या घराशेजारच्या कुटूंबातील सदस्य सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भंगाळे यांच्या प्रांगणातील पेपर घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना घराला लावलेले कुलूप तुटलेले आढळल्याने त्यांना घरफोडीचा संशय आला व बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवल्यानंतर यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी प्रमोद भंगाळे यांना कल्पना दिल्यानंतर त्यांना मोठा धक्काच बसला. सायंकाळी उशिरापर्यंत ते कर्नाटक एक्स्प्रेसने भुसावळात दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. भंगाळे यांच्याकडे मोठी घरफोडी झाल्याने त्यांच्या तक्रारीअंतीच गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अन्य तीन घरे फोडली : ऐवज नसल्याने दिलासा
भंगाळे यांच्या घराजवळील दुसर्या गल्लीतही चोरट्यांनी तीन घरे फोडली मात्र सुदैवाने घरात कोणताही किंमती वा मोठा ऐवज नसल्याने चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. समजलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पंढरीनाथ महादू पाटील, अमोल गिरी तसेच सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागात कार्यरत अच्युत मायानगरी यांच्या घरात घरफोडी केली. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत सामान अस्ताव्यस्त केला मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे सूत्रांनी सांगितले शिवाय तक्रारदारांशी संवाद साधल्यानंतर त्यांनीदेखील किंमती ऐवज घरात नसल्याची पुष्टी केली.
पोलीस यंत्रणेची धाव
बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह बाजारपेठ डीबी शाखेचे हवालदार विजय नेरकर यांच्यासह सहकार्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तक्रारदार पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यातून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.




