जळगावात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील दिड लाखांची सोनपोत लांबवली


जळगाव (16 जून 2026) : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी मॉर्निंग वॉक करणार्‍या मंगला शांताराम चौधरी (75, रा.अयोध्यानगर) यांच्या गळ्यातील दिड लाख रुपये किंमतीची तीन तोळे सोन्याची सोनपोत लांबवली. ही घटना 14 जून रोजी अयोध्या नगरात घडली. या प्रकरणी सादीक शेख इबाबत शेख इराणी (23, रा.पापा नगर, भुसावळ) व त्याच्या साथीदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
शहरातील अयोध्या नगरातील रहिवासी मंगला चौधरी या नेहमीप्रमाणे 14 जून रोजी सकाळी मार्निंग वॉक करीत असताना समोरून एका दुचाकीवरुन दोन संशयित हे वृद्धेजवळ आले. त्यांच्यातील दुचाकी चालविणार्‍याने वृद्ध महिलेला पत्ता विचारला. वृद्धा हाताच्या इशाराने संबंधित ठिकाण सांगत असतानाच दुचाकीवरील मागे बसलेल्याने वृद्धेच्या गळ्यातील एक लाख 50 हजार रुपये किंमतीची सोनपोत ओढली. त्यानंतर दोघेही दुचाकीस्वार भुसावळकडे जाणार्‍या रस्त्याने भरधाव वेगाने निघून गेले.

वृद्धेने आरडाओरड केल्यानंतर त्यांचा मुलगा व इतर नागरिक तेथे आले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून सादीक सह त्याच्या सोबत असलेला साथीदार अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !