अमळनेर पोलिसांची कामगिरी : बसमध्ये चढणार्या महिलेची पोत लांबवणार्या महिलांना बेड्या
अमळनेर (16 जून 2026) : बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पोत चोरणार्या दोघा महिलांना अवघ्या दोन तासात पोलिसांनी मालेगाव येथून अटक केली. शिरुड येथील कल्पनाबाई अशोक-शिंपी (65) ही महिला 9 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानकावरून शिरूड जाण्यासाठी मुकटी बसमध्ये चढत असताना 15 हजार रुपये किंमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली.
या प्रकरणी महिलेने अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, प्रशांत पाटील, सूर्यकांत साळुंखे, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे यांच्या पथकाला चोरट्यांचा शोध घ्यायला पाठवले. पोलिसांनी बसस्थानक आणि बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना दोन संशयित महिला बसजवळ आणि बाहेर रिक्षामध्ये बसतांना आढळल्या. पोलिसांनी तातडीने रिक्षाचा पाठलाग केला.
मालेगावजवळ या रिक्षाला महिलांसह पकडण्यात आले. शारदा सुनील कसबे (35) व माया श्रावण कांबळे (55, रा. एकविरा माता मंदिराजवळ, धुळे) असे अटकेतील महिलांचे नाव आहे. या महिलांनी चोरी करण्यासाठी भाड्याने रिक्षा केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. चोरीनंतर अवघ्या दोन तासात आरोपींना पकडल्याने पोलिसांच्या कामगिरी कौतुक होत आहे.




