सोशल मिडीयावर प्रेम बहरले : पतीसह सासरच्यांना सोडून विवाहिता प्रियकरासोबत भुर्रर !
Romance Blossoms on Social Media: Married Woman Leaves Husband and In-Laws to Elope with Lover! कन्नड (18 जून 2026) : सोशल मिडीयातून एकाशी झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले व विवाहिता विवाहित प्रियकरासोबत पळाली मात्र विवाहिता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याने शोध सुरू असताना विवाहिता कन्नडमार्गे प्रवास करीत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर समन्वयातून तिला प्रियकरासोबत ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती व सासरची, माहेरची मंडळी दाखल झाली असता सर्व नातेवाईकांना नाकारत प्रियकरासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना कन्नड ग्रामीण ठाण्यात समोर आली.
काय आहे प्रकरण
कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण गिते यांना बीड पोलिसांकडून वायरलेसवर संदेश मिळाला. चाळीसगावकडून कन्नड घाटाच्या दिशेने एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची कार येत असून ती ताब्यात घेण्याचे आदेश होते. या माहितीवरून एपीआय गीते, उपनिरीक्षक एम.मुंडे, महामार्ग उपनिरीक्षक सागर पाटील, तावणे, महेश जाधव, गहिनीनाथ बावनकर, शहेनशहा सय्यद, महिला पोलीस शेळके, शिरसाठ, आर.एन.वाव्हळयांनी सकाळी 11 वाजता घाटातील भांबरवाडी नाक्यावर सापळा रचला आणि संशयित कार ताब्यात घेतली. या कारमध्ये कारचालकासह एक युवती आणि दीड महिन्याचे बाळ होते. पोलिसांनी त्यांना ठाण्यात आणून बीड पोलिसांना माहिती दिली.


बाळाला घेत विवाहिता घरून पसार
बीड पोलिसात 3 जून रोजी ही महिला दीड महिन्याच्या बाळासह बेपत्ता झाल्याची तक्रार होती. पोलिसांनी चौकशी केली असता या महिलेचे आठ वर्षांपूर्वी एका व्यापार्यासोबत लग्न झाले असून, तिला चार वर्षांचा आणि एक दीड महिन्याचा अशी दोन मुले आहेत. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिची बीडमधीलच एका पुरुषाशी ओळख झाली. तो पुरुषही विवाहित असून त्याला एक मुलगा आहे आणि तो बेरोजगार आहे. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ती दीड महिन्याच्या बाळाला घेऊन घरसोडून पळून आली होती. कुटूंबाने मनधरणी केली मात्र अपयश आले.
तिने मागे वळूनही पाहिलेच नाही
विवाहिता सापडल्याची माहिती मिळताच महिलेचा पती, सासू, सासरे, आई-वडील आणि भाऊ कन्नड ग्रामीण ठाण्यात पोहोचले. सर्वांनी डोळ्यात अश्रू आणून तिला घरी परतण्याची विनवणी केली. पोलिसांनीही मनधरणी केली परंतु महिलेने मी माझ्या स्वखुशीने या पुरुषासोबत जात आहे, असा लेखी जबाब दिला. मागे वळून न पाहता बाळाला कडेवर घेऊन प्रियकरासोबत गेली.

