जळगावात चार लाखांची चोरी : घरकाम करणार्‍या महिलेसह परप्रांतीय साथीदार जाळ्यात

एमआयडीसी पोलिसांची कारवाई ; मेहरुण परिसरातील घरफोडींचा उलगडा


Theft of ₹4 lakh in Jalgaon: Domestic worker and her accomplice from another state nabbed जळगाव (19 जून 2026) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहरूण तलाव परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी घरकाम करणार्‍या महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे 4 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहरूण तलाव परिसरातील रहिवासी सौ. सुधा प्रज्ञाभूषण कावरा (वय 51) यांनी त्यांच्या घरातून तसेच समोरील घरातून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.




गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तपासाच्या सूचना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि चौकशीच्या आधारे घरकाम करणारी महिला समताबाई धर्मराज धांडेकर (वय 44, रा. येणुका नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा. धारणी, जि. अमरावती) हिच्यावर संशय बळावला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली.

चौकशीत तिने ही चोरी आपल्या साथीदार धर्मराज हरिसिंग मीना (वय 28, व्यवसाय – बांधकाम मजूर, रा. ग्राम पिपराई, गंजबसौदा, जि. विदिशा, मध्यप्रदेश) याच्या मदतीने केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी धर्मराज मीनालाही अटक केली.

आरोपींकडून 3 लाख 9 हजार रुपये किमतीचा 23.20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस तसेच 91 हजार रुपये किमतीची 6.64 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील दागिने असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !