‘कॉमन गर्लफ्रेंड’ चा वाद मित्राच्या जीवावर : तीन आरोपींना अटक
Dispute over ‘common girlfriend’ costs friend his life ; three accused arrested पुणे (20 जून 2026) : दोघा मित्रांची एकच प्रियसी असल्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला तर तीन संशयीतांना पोलिसांनी अटक केली. ही घटना पुण्यातील गोखले नगर परिसरात घडली. हर्ष मच्छिंद्र जाधव (23, रा. गोखलेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत नवी मुंबईतून अटक केली. अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर अशी संशयीतांची नावे आहेत.
पहाटेच्या सुमारास रिक्षातून ओढून हल्ला
घटनेच्या दिवशी पहाटे पावणेतीन ते तीन वाजेच्या सुमारास हर्ष जाधव त्याच्या घराबाहेर एका रिक्षात बसला होता. यावेळी तिथे पोहोचलेल्या आरोपींनी हर्षला जबरदस्तीने रिक्षाबाहेर ओढले आणि बेसबॉल स्टिकने त्याच्यावर बेदम मारहाण सुरू केली. या हल्ल्यादरम्यान बेसबॉल स्टिकचा एक जोरदार वार हर्षच्या कानावर बसला, ज्यामुळे त्याचा कान फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. आरडाओरड ऐकून स्थानिक रहिवासी गोळा झाल्यावर आरोपी तिथून पळून गेले.



उपचारादरम्यान झाला मृत्यू
जखमी हर्षला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले की, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, तरीही गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. परिमंडळ चारचे डीसीपी रजनीकांत चिलीमुला यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार दोघांच्या कॉमन गर्लफ्रेंडच्या वादातून आणि घरात घुसून दिलेल्या धमकीच्या रागातून घडला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
काय होता नेमका वाद?
मृत हर्ष जाधव आणि आरोपी यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून कॉमन गर्लफ्रेंड’वरून तीव्र वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून दोन दिवसांपूर्वी हर्षने दारूच्या नशेत आरोपीच्या घरात घुसून मोठा गोंधळ घातला होता. तसेच आरोपीच्या कुटुंबीयांसमोरच त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या अपमान आणि धमकीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हर्षचा काटा काढण्याचे ठरवले.

