सीफूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती ; सात महिला कामगारांचा मृत्यू
Ammonia gas leak at seafood export plant ; seven female workers die तिरुवल्लूर/तमिळनाडू (21 जून 2026) : सीफूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाल्याने या दुर्घटनेत सात महिला कर्मचार्यांचा मृत्यू झाला तर 67 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 9 जण व्हेंटिलेटरवर आहेत. वायू गळतीची घटना तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील सेंट पीटर्स पॉल सीफूड्स एक्सपोर्ट्स युनिटमध्ये रविवारी घडली.
घटनेची माहिती मिळताच अरक्कोनम येथील एनडीआरएफच्या चौथ्या बटालियन मुख्यालयातून 30 सदस्यांची एनडीआरएफ टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली.



तामिळनाडू सरकारने मृतकांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या कर्मचार्यांवर उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देशही रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी एस. कविता यांनी सांगितले की, 46 रुग्णांना वेल्स रुग्णालयात आणि 21 रुग्णांना व्यंकटेश्वरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर अवस्थेतील नऊ रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी रुग्णवाहिकेने चेन्नई येथील शासकीय स्टॅनले मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बळी पडलेल्यांपैकी बहुतेक 24 ते 25 वयोगटातील तरुण महिला होत्या. त्यांनी सांगितले की, रुग्णांच्या नाडी आणि रक्तदाबावर लक्ष ठेवले जात आहे. अनेकांचा रक्तदाब कमी असला तरी, त्यांचे वय कमी असल्याने त्या बर्या होण्याची शक्यता आहे.

