नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : एमपीतील आंतररराज्यीय टोळी जाळ्यात : चोरीच्या 21 दुचाकी जप्त

नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुन्ह्यांची उकल ; चार आरोपींना बेड्या : युपीसह गुजरात व पुण्यातून दुचाकींची चोरी


गणेश वाघ
Major achievement by Nandurbar Crime Branch: Inter-state gang from MP nabbed; 21 stolen two-wheelers seized भुसावळ (22 जून 2026) : नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोटारसायकल चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून सुमारे सात लाख 50 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 21 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. आरोपींच्या अटकेनंतर नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुन्ह्यांची उकल झाली असून पुण्यासह, युपी, गुजरातमधील दुचाकी चोंरीचा उलगडा झाला आहे तर तीन दुचाकीच्या मालकांबाबत वाहनाच्या चेसीस क्रमांकासह इंजिन क्रमांकावरून तपास सुरू आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाण्यांना चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना चोरट्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने 20 जून रोजी म्हसावद ते राणीपूर रस्त्यावर दोन संशयित व्यक्ती विनानंबर सुपर स्प्लेंडर मोटारसायकलवर फिरत असताना त्यांना सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

चोरट्यांच्या चौकडीकडून 21 दुचाकी जप्त
चोरट्यांनी चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावे सुरेश संतोष मुखडे (20, रा.राखी, ता.पानसेमल, जि.बडवाणी), सुनील भाबल्या वळवी (20, रा. चार्लीफाटा, ता.पानसेमल, जि.बडवाणी) सांगितली व चौकशीत आरोपींना बोलते केल्यानंतर त्यांच्याकडील दुचाकी त्यांनी धडगाव परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी धडगाव पोलिसात गुन्हा क्रमांक 209/2026 दाखल असल्याचे तपासात समोर आले. यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्यप्रदेशातील विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींचा साथीदार गुलाबसिंग उर्फ गुलच्या इसमा वळवी (रा.चार्लीफाटा, ता. खेतिया, जि. बडवाणी) याच्यासह आणखी एका संशयिताचा शोध घेत कारवाई केली.

सहा गुन्ह्यांची उकल
अटकेतील चौकडीकडून सात लाख 50 हजार रुपये किंमतीच्या तब्बल 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे, शहादा पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाण्याचा समावेश आहे. शिवाय पुण्यातील दोन, गुजरातमधील सहा, मध्यप्रदेशातील तीन आणि उत्तर प्रदेशातील एका मोटारसायकलीचा तपास पूर्ण करण्यात आला आहे. उर्वरित तीन दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यांनी केली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सज्जन वाघ, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, योगेंद्र सोनार, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार यशोदीप ओगले, विशाल मराठे आणि सचिन सेंदाणे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !