मंडळाधिकार्याच्या नावाने पाच हजारांची लाच : खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
नाशिक (22 जून 2026) : शेतजमिनीच्या सपाटीकरणाच्या कामासाठी मंडळ अधिकार्याच्या नावाने पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नाशिकमधील पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई संगमनेर तालुका पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली. नितीन किसन खर्डे (29, रा. चंदनपुरी शिळे, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार शेतकर्यांकडील शेतजमिनीचे सपाटीकरण करतात. 8 जून रोजी खाजगी इसम नितीन खर्डे यांना तलाठी कार्यालयात बोलावून घेतल्यानंतर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कामाबाबत चर्चा केली. त्यानंतर नितीन खर्डे याने तक्रारदार यांच्याकडून जमीन सपाटीकरण कामासाठी मंडळाधिकारी यांच्यासाठी पाच हजारांची लाच मागणी केली व पैसे न दिल्यास तक्रारदारांविरुद्ध अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार दाखल केली. विभागाने केलेल्या पडताळणीत आरोपी नितीन खर्डे याने तक्रारदारांकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोमवार, 22 जून 2026 रोजी सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान आरोपीने तक्रारदारांकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. संगमनेर तालुका पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा
हा सापळा पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार संदीप बनवे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे आदींनी यशस्वी केला.
लाचखोरांविरोधात एसीबीचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय कर्मचारी किंवा लोकसेवक कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास त्वरित एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.

