धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : शेतकर्‍यांचे पशूधन लांबवणार्‍या नवापुरातील टोळीचा पर्दाफाश

एकाला अटक, चार गुन्ह्यांची उकल : नऊ म्हशीसह दोन पारडू व चारचाकीसह 15.90 लाखांचा मुद्देमाल जप्त


Major operation by Dhule Crime Branch : Gang from Navapur stealing farmers’ livestock busted धुळे (22 जून 2026) : शेतकर्‍यांच्या पशुधन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत पशुधन चोरणार्‍या सराईत आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 9 म्हशी, 2 पारडू आणि चोरीसाठी वापरलेली एक चारचाकी वाहन असा एकूण 15 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पशूधन चोरी व वाहन चोरीचे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
धुळे जिल्ह्यातील साक्री व पिंपळनेर परिसरात शेतकर्‍यांच्या शेतातून पशूधन चोरीच्या घटना घडत होत्या. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे विशेष पथक तयार करून सखोल तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी साक्री-नवापूर मार्गावरील एका पानटपरीजवळ संशयित सुरेश ऊर्फ सुर्‍या रमेश गावीत (32, रा. सारवट, ता. नवापूर, जि. नंदुरबार) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह पशुधन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या साथीदारांमध्ये प्रभू होड्या गावीत (रा.उची शेवडी, ता.नवापूर, जि.नंदुरबार), योहान जनू गावीत (रा.ओंटी पाडा, विसरवाडी, ता.नवापूर), रवी गावीत (रा.रायपूर, ता.नवापूर, जि.नंदुरबार) यांचा समावेश असल्याची कबुली दिली.

पशूधन जप्त : चार गुन्ह्यांची उकल
पोलिसांनी अटकेतील आरोपीकडून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या 9 म्हशी, 2 पारडू तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली पाच लाख रुपये किंमतीची टाटा आर..एक्स. (क्रमांक एम.एच.18 ए.ए.2376) जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 15 लाख 90 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींच्या अटकेनंतर साक्री ठाणे हद्दीतील तीन तर पिंपळनेर हद्दीतील एका गुन्ह्याची उकल झाली. टोळीचा अटकेतील म्होरक्या सुरेश ऊर्फ सुत्या रमेश गावीत आणि प्रभू होड्या गावीत यांच्याविरोधात यापूर्वीही चोरीचे सुमारे 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

यांनी केला टोळीचा पर्दाफाश
ही उल्लेखनीय कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सदेसिंग चव्हाण, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी, योगेश जगताप, अमोल पाटील आणि कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !