रावेर पोलिसांची मोठी कामगिरी : खानापूरातील दुचाकी चोरट्यांना बेड्या : चोरीच्या दोन दुचाकी जप्त


Major achievement by Raver police: Two-wheeler thieves from Khanapur arrested; two stolen two-wheelers seized रावेर (24 जून 2026) : रावेर पोलिस ठाण्यात नव्यानेच रूजू झालेल्या निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने खानापूर, ता.रावेर येथील दोन दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी रावेरातील मंगल कार्यालयाबाहेरून एका दुचाकी चोरीची कबुली दिली आहे तर दुसर्‍या दुचाकीबाबत तपास सुरू आहे. समाधान उर्फ शंभू रमेश जाधव (33) व मनोज भागवत चंदनकर (39, दोन्ही रा.खानापूर, ता.रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

रावेरातून लांबवली दुचाकी
तक्रारदार अतुल अर्जुन महाजन (रा. कुसुंबा, ता. रावेर) हे मंगळवार, 23 जून रोजी दुपारी रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालयात लग्नासाठी आल्यानंतर त्यांची होंडा कंपनीची युनिकॉन (क्रमांक एम.एच.19 डी.टी.7111) काही वेळेत लांबवण्यात आली होती. रावेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर दुचाकीची छायाचित्रे सोशल मिडीयात पोस्ट करण्यात आली. रावेरचे नूतन निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदाराने खानापूरच्या संशयीताकडे दुचाकी दिसल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकाला सांगून ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान त्यांनी दोन दुचाकी काढून दिल्या. त्यात रावेरातून महाजन यांच्या चोरलेल्या 15 हजार रुपये किंमतीच्या युनिकॉनसह अन्य एका दहा हजार रुपये किंमतीच्या विना क्रमांकाच्या स्प्लेंडरचा समावेश आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आणखी काही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी केली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !