दीपनगर केंद्रात अतिरीक्त खर्चाच्या नावाखाली 300 कोटींचा गैरव्यवहार : आमदार एकनाथराव खडसे
गरज भासल्यास एसआयटी चौकशी करणार : उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस
Misappropriation of ₹300 crore at Deepnagar plant under the guise of additional expenses : MLA Eknathrao Khadse भुसावळ (26 जून 2026) : महानिर्मितीमधील हेड 71 व 76 मधून झालेल्या अनधिकृत कामांच्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी लक्ष वेधले होते तर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित करीत व्हेरिएबल कॉस्ट अंतर्गत 300 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सांगितले. या प्रश्नावर उत्तर देताना उर्जामंत्री फडणवीस यांनी आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल आणि गरज पडल्यास या प्रकरणाची ’एसआयटी’मार्फत चौकशी केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
काय आहे आमदार खडसेंचा दावा
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांनी महाजनकोमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात कामांचे आदेश न देताच किंवा अर्धवट कामांची पूर्ण बिले काढून सुमारे 300 ते 325 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप खडसे यांनी पुराव्यांसह केला. महाजेनकोच्या इतर सात केंद्रांमध्येही अशाच प्रकारचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून, वरिष्ठ अधिकार्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नसल्याने याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.


यावर उत्तर देताना उर्जामंत्री फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे आधीच पाच सदस्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी पुढील एका महिन्यात पूर्ण केली जाईल. यामध्ये काही तथ्य आढळल्यास एआयटी स्थापन करून पुढील कारवाई केली जाईल.
तीन वर्षांत सर्वांत स्वस्त वीज तयार केली
गेल्या तीन वर्षांत महाजेनकोने सर्वात स्वस्त वीज तयार केली असून ’प्लँट लोड फॅक्टर’ देखील ऐतिहासिक पातळीवर वाढल्याचे त्यांनी नमूद केले मात्र कामात कुठेही भ्रष्टाचार होत असेल, तर तो सहन केला जाणार नाही आणि संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी सभागृहात दिले.
