धुळ्यात 23 गुन्ह्यातील दोन कोटी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांचा नाश
Narcotics worth two crore rupees, seized in 23 cases, destroyed in Dhule धुळे (26 जून 2026) : आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हास्तरीय प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीतर्फे धुळे जिल्ह्यातील तब्बल 23 गुन्ह्यातील दोन कोटी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला. यात 901 किलो गांजा, 173.90 किलो अफूची बोंडे, 94 ग्रॅम एमडी ड्रग्स, कोडीन सिरप आदींचा समावेश आहे.
कायदेशीर प्रक्रियेनंतर अंमली पदार्थ नष्ट
नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एक कोटी 80 लाख 30 हजार रुपये किंमतीचा 901.506 किलो गांजा, 26 लाख आठ हजार 500 रुपये किंमतीची 173.90 किलो अफूची बोंडे, 9 हजार 400 रुपये किंमतीचे 94 ग्रॅम एमडी ड्रग्स, तीन लाख रुपये किंमतीचे कोडीन कफ सिरप तसेच 220 स्ट्रिप अल्प्राझोलम गोळ्यांचा समावेश होता. एकूण दोन कोटी नऊ लाख 49 हजार 380 रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.


यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हास्तरीय प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सदस्य तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे, पोलीस उपअधीक्षक अजय देवरे, प्रभारी उपअधीक्षक (गृह) अभिजीत सोनवणे, तहसीलदार अतुल शेवाळे आणि सहायक रासायनिक विश्लेषक अतुल पाटील यांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या उपस्थितीत शासकीय पंच हर्षल जोशी व महेंद्र कापडे यांनी पंचनामा केला.
