मुक्ताईनगर पोलिसांची आजवरची मोठी कारवाई : चोरट्यांच्या चौकडीकडून चोरीच्या 29 दुचाकी जप्त

जळगावसह गुजरात, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे व रायगड जिल्ह्यांतील 22 गुन्ह्यांची उकल; 26 लाखांची वाहने जप्त


गणेश वाघ
Major operation by Muktainagar police: 29 stolen two-wheelers seized from a gang of four thieves. भुसावळ (27 जून 2026) : जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुक्ताईनगर पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी कारवाई करत आंतरजिल्हा मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे 26 लाख रुपये किंमतीच्या 29 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून त्यातील 22 दुचाकी चोरीबाबत गुन्हे दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

गोपनीय माहितीद्वारे आरोपी जाळ्यात
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात शुक्रवार, 26 जून 2026 रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 273/2026 (भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2)) अंतर्गत तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. त्यानुसार विशाल सुरेश सोनवणे (पिंपरुड, ता.यावल, जि. जळगाव), कुंदन सुनील महाले (रा.सालबर्डी, ता.मुक्ताईनगर), वढवे व सालबर्डी येथे दोन अल्पवयीन संशयिताना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.



अशी आहे चोरीची पद्धत
आरोपींनी राज्यभरातून दुचाकी चोरी करीत त्यात विविध ठिकाणावरील बसस्थानक तसेच रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये पार्क केल्या व तेथून आरोपी ग्राहकाला अल्प किंमतीत दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या ताब्यातून 25 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या एकूण 29 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

तपासादरम्यान आरोपींकडून 22 चोरीचे गुन्हे उघड
या प्रकरणातील वाहनचोरीचे 22 गुन्हे गुजरात राज्यातील उधना (सुरत) पोलीस ठाणे, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, नवी मुंबईतील नेरुळ, नाशिक जिल्ह्यातील निफाड, पुणे शहरातील वणी व इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, रायगड जिल्ह्यातील नेरळ, तसेच जळगाव जिल्ह्यातील पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे. अन्य सात दुचाकींबाबत वाहनाच्या चेसीस व इंजिन क्रमांकावरून माहिती काढली जात आहे.

यांनी केली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार अजय खंडेराव, हवालदार महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक असीम तडवी, पोलीस नाईक कलेश आमोदकर, पोलीस अंमलदार संदीप धनगर, सुनील मोरे, चेतन महाजन, रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, रमेश खोडपे, दीपक ठाकरे, स्वप्नील पवार आणि अक्षय वाढे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !