धुळे गुन्हे शाखेची कारवाई : गावठी पिस्टलासह चार जिवंत काडतुस जप्त
अंतर्गत वादातून हल्ल्याच्या तयारीत संशयीताला पकडले : उमर्टीतून आणले शस्त्र
Dhule Crime Branch Action : Country-made pistol and four live cartridges seized धुळे (28 जून 2026) : धुळे जिल्ह्यात अंतर्गत वादातून प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणार्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि एक चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी तो हाणून पाडला आहे. सुमित सुभाष शिंदे (36, रा.सतीश नगर, देवपूर, धुळे) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना संशयीताबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. सुमित सुभाष शिंदे (36, रा.सतीश नगर, देवपूर, धुळे) हा आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी बलेनो (क्रमांक एम.एच.18 बी.आर.9103) या वाहनातून धुळे शहरातील संत रोहिदास गार्डन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास पथकाने
सापळा रचून ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून 40 हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, चार हजार रुपये किंमतीचे चार जिवंत काडतुस व आठ लाख रुपयांची बलेनो कार जप्त करण्यात आली.


उमर्टी पुन्हा ऐरणीवर
प्राथमिक चौकशीत आरोपीने मध्यप्रदेशातील उमर्टी येथून गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे खरेदी केल्याची कबुली दिली आहे. शस्त्र तस्करीसाठी उमर्टी येथे हे प्रसिद्ध असून राज्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये उमर्टीतील अवैध शस्त्रांचा वापर झाल्याचे समोर आले आहे. आरोपीने अंतर्गत वादातून त्यांचा वापर करण्याचा त्याचा मानस असल्याचे समोर आले आहे त्यामुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळविले. देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस अंमलदार योगेश चव्हाण, दिनेश परदेशी, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार, आशीषकुमार वानखेडे, अमोल पाटील आदींच्या पथकाने केली.
