नसरापूर हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा
Death sentence for the accused in the Nasrapur murder case पुणे (29 जून 2026) : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार व हत्येप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला सोमवार, 29 रोजी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
विकृत मानसिक असलेल्यांसाठी हा कठोर इशारा
नसरापूर निकालावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, विकृत मानसिकता असलेल्या सगळ्यांसाठी हा निकाल म्हणजे कठोर इशारा आहे. विकृतपणा कराल तर अशाच पद्धतीने नांग्या ठेचून काढू असा स्ट्राँग मेसेज या निमित्ताने कोर्टाने दिल्याचे त्या म्हणाल्या.


तपासाचे केले कौतुक
निकालपत्राचे वाचन करताना न्यायाधीश म्हणाले की, हत्येनंतरही आरोपीने लैंगिक अत्याचार सुरू ठेवल्याने त्यास फाशीची शिक्षाही अपुरीच आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याने ते अभिनंदनास पात्र आहे व विशेष सरकारी वकिलांनी सचोटीने पाठपुरावा केला. अत्याचार करताना आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला व पीडितेच्या शरीरावर 18 जखमा आढळल्या तर या घटनेला दुर्मिळातील दुर्मिळ घटना बोलले पाहिजे, असेही न्यायाधीश म्हणाले.
विविध कलमाखाली आरोपीला फाशी
पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नागरिक आणि विविध सामाजिक संघटनाही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होती. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयाने गुरुवारी कांबळेला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवले. त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्या वर सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि मूळ फिर्यादी यांच्या वतीने स्वतंत्रपणे युक्तिवाद करण्यात आला.
सरकारी पक्षाची फाशीची मागणी
सरकारी वकील अॅड.अजय मिसर यांनी न्यायालयाकडे हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचा युक्तिवाद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांनीही आरोपीला फाशीच व्हावी, अशी भूमिका घेतली होती.
आरोपीने मांडला वयाचा मुद्दा ; न्यायालयाने फेटाळला
सुनावणीदरम्यान आरोपीच्या बाजूने त्याच्या वाढत्या वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. वयाचा विचार करून फाशीऐवजी सौम्य शिक्षा द्यावी, अशी विनंती बचाव पक्षाने केली मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला नसल्याची माहिती समोर आली आहे.
मेडिकल अहवालातील धक्कादायक निष्कर्ष
सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सादर केलेल्या मेडिकल अहवालानुसार, आरोपीने चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, तिचा मृत्यू झाल्यानंतरही अत्याचार सुरूच ठेवल्याचा गंभीर दावा सरकारी पक्षाने केला. या अहवालातील निष्कर्षांमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.
