शेतात काम करताना वीज कोसळल्याने कठोर्यातील तरुणाचा मृत्यू
Youth from Kathora dies after being struck by lightning while working in the field भुसावळ (30 जून 2026) : वडिलांसोबत शेतात काम करीत असताना अचानक अंगावर वीज पडल्याने 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अखिलेश किशोर तायडे (21) असे मृताचे नाव आहे या घटनेने कठोरा बुद्रुक गावात शोककळा पसरली.
अचानक कोसळली वीज
कठोरा बुद्रुक शिवारातील शेतामध्ये किशोर तायडे आणि त्यांचा तरुण मुलगा अखिलेश हे दोघे नेहमीप्रमाणे शेतीची कामे करत होते. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वार्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी विजांचा कडकडाट प्रचंड प्रमाणात वाढला होता. काही समजण्याच्या आतच, शेतात काम करत असलेल्या अखिलेशच्या अंगावर थेट वीज कोसळली. हा धक्का इतका भीषण होता की, अखिलेशचा जागीच मृत्यू झाला. वडिलांसमोरच हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग घडल्याने परिसरात खळबळ उडाली.


घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर शेतकर्यांनी आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अखिलेशला तातडीने उपचारासाठी वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
अखिलेशने नुकतीच आपली अप्रेंटिसशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. त्याला लवकरच चांगली नोकरी मिळणार होती. घरात नोकरीच्या आणि सुखाच्या दिवसांची सुरुवात होणार असतानाच, निसर्गाच्या या अवकृपेने एका उमद्या तरुणाचा जीव घेतला. नोकरी लागण्यापूर्वीच अखिलेशचा असा दुर्दैवी अंत झाल्याने तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
