अनुदान मंजुरीसाठी पाच हजारांची लाच : नंदुरबार खादी ग्रामोद्योग मंडळाचा पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वीकारली लाच : लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ


गणेश वाघ
₹5,000 bribe for grant approval: Nandurbar Khadi and Village Industries Board supervisor caught in ACB trap भुसावळ (30 जून 2026) : दहा लाखांच्या कर्जावर साडेतीन लाखांची सबसिडी (अनुदान) मंजूर करून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना नंदुरबार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातील वरिष्ठ पर्यवेक्षकाला नंदुरबार एसीबीने अटक केली आहे. हा सापळा सोमवार, 30 जून रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील टोकरे तलाव रस्त्यावर करण्यात आली. जिजाबराव साहेबराव चौधरी (56, नंदुरबार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
नंदुरबार एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या नातलगाला 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत पापड उद्योग व पीठ गिरणी या व्यवसायासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले व या कर्जावर 35 टक्के अनुदान (सबसिडी) मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव संबंधित कार्यालयामार्फत मुंबई येथील मुख्य कार्यालयात पाठविण्यात आला. त्यानुसार तक्रारदारांच्या कर्ज खात्यात तीन लाख 50 हजार रुपयांची सबसिडी जमा झाली होती.



यानंतर संबंधित वरिष्ठ पर्यवेक्षक जिजाबराव चौधरी यांनी तक्रारदाराला सबसिडी मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून सुरुवातीला 10 ते 12 हजार रुपये बक्षीस स्वरुपात मागणी केली. तक्रारदाराने तडजोड केल्यानंतर पाच हजार रुपये देण्याचे ठरले मात्र तक्रारदारालाच लाच द्यायची नसल्याने त्यांनी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीनंतर सोमवारी सायंकाळी सापळा रचून आरोपीला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहा.उपनिरीक्षक विलास पाटील हवालदार देवराम गावीत, हवालदार विजय ठाकरे, हवालदार हेमंतकुमार महाले, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र महाले, हवालदार संदीप खंडारे, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.

लाचखोरांविरोधात पुढे येण्याचे आवाहन
लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी 1064 किंवा 7798161064 वर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार एसीबीतर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !