नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील चिमुकलीवर अत्याचार : नराधमाला 20 वर्ष शिक्षा
Assault on a young girl within Nashirabad police station limits: Monster sentenced to 20 years in prison नशिराबाद (2 जुलै 2026) : नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील अवघ्या चार वर्षीय बालिकेवर तिच्या नात्यातील 28 वर्षीय नराधमाने अत्याचार केला होता. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव न्यायालयात 9 फेब्रुवारी 2022 रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर 24 जुलै 2022 रोजी आरोप निश्चिती झाली. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या.पी.पी.बांकर यांनी आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात पीडित बालिकेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 10/2022 अंतर्गत नाशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर 9 फेब्रुवारी 2022 रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर 24 जून 2022 रोजी आरोप निश्चित करण्यात आले.


या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-3, जळगाव यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षींचा सखोल विचार करून आरोपीला दोषी ठरवत 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच 20 हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
बाल साक्षीदारांनी तपासादरम्यान तसेच न्यायालयात आरोपीची सातत्यपूर्ण आणि ठोस ओळख पटविली. न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवालातील वैज्ञानिक पुराव्यांमुळे आरोपीचा गुन्हा व घटनास्थळाशी संबंध स्पष्टपणे सिद्ध झाला. वैद्यकीय अहवालात पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच तिच्या खासगी अवयवांवरील दुखापतींची नोंद असल्याचे नमूद करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भास्कर साळुंखे यांनी केला. जळगाव न्यायालयात सरकार पक्षाची बाजू सरकारी अभियोक्ता अॅड.एस.जी.काबरा यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांच्या युक्तिवादासह सादर करण्यात आलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली.
