इन्स्टाग्राम-फेसबुकवर ‘दुप्पट पैशांचे’ आमिष दाखवून लुटमार करणार्‍या टोळीचा म्होरक्या जाळ्यात

धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई ; 95 हजारांची रोकड जप्त


Ringleader of gang that swindled people on Instagram and Facebook with promises of ‘doubling their money’ nabbed धुळे (2 जुलै 2026) : सोशल मीडियावर एक लाखाचे सात लाख, दोन लाखाचे 15 लाख (जुनी करन्सी) मिळतील अशा आकर्षक रिल्स प्रसारित करून आर्थिक आमिष दाखवत नागरिकांना जाळ्यात ओढून निर्जन जागी लुटणार्‍या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धुळे तालुका असा गुन्हा घडल्यानंतर यंत्रणेने एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून 95 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपीने अन्य दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सुनील उर्फ अविनाश शंकर भोसले (45, ककमडी, ता.आनणी, जि.बेळगाव, ह.मु.पारधीवस्ती, अजनाळे, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नेमके प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनाळे व हेंकळवाडी परिसरातील काही तरुण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इन्स्टाग्राम व फेसबुकवर इंडियन सेकंड करन्सी मिलेगी तसेच एक लाखाचे सात लाख, दोन लाखाचे 15 लाख अशा शीर्षकांच्या रिल्स प्रसारित करत होते. या रिल्स पाहून संपर्क साधणार्‍या व्यक्तींना मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून त्यांना अजनाळे व हेंकळवाडी परिसरातील निर्जन ठिकाणी बोलावल्यानंतर तेथे आरोपींकडून शस्त्राचा धाक दाखवून पीडितांना शिवीगाळ, मारहाण केली जात होती. त्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिने व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले जात होते. भीतीमुळे अनेक पीडितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नसल्याने या टोळीचे कारनामे बराच काळ सुरू होते.



या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात 10 जून 2026 रोजी गुन्हा क्रमांक 351/2026 दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी सुनील उर्फ अविनाश शंकर भोसले (45, ककमडी, ता.आनणी, जि.बेळगाव, ह.मु.पारधीवस्ती, अजनाळे, ता.धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने अन्य दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 95 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड, पोलीस अंमलदार रवींद्र सोनवणे, कुणाल शिंगाणे, महेंद्रसिंग गिरासे, भावेश झिरे आणि सुरेंद्र खांडेकर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !