चोपड्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; गावठी कट्टा, मॅगझिनसह आंतरजिल्हा टोळी जाळ्यात
Local Crime Branch conducts bold raid in Chopda; inter-district gang nabbed with a country-made pistol and magazine चोपडा (2 जुलै 2026) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि चोपडा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध शस्त्रांची वाहतूक करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चोपडा-लासूर-चुंचाळे मार्गावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. संशयित हुंडाई एव्हॉन कारची तपासणी केली असता मागील सीटखाली गावठी कट्टा, मॅगझिन तसेच अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. आरोपींकडून तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. अटकेतील आरोपींमध्ये ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (39, कुर्हाडखुर्द, ता.पाचोरा, जि.जळगाव), सचिन रोशन पवार (34, मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल कचरू साबुंखे (37, जाधव गल्ली, गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.


सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 60 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, दहा हजारांचे अतिरिक्त मॅगझिन, पाच लाखांची कार व 30 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार दीपक माळी, हवालदार रवींद्र पाटील, विष्णू बिर्हाडे, रावसाहेब पाटील तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सहा.निरीक्षक युवराज वाळुंज, कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी, कॉन्स्टेबल योगेश पाटील, कॉन्स्टेबल रजनीकांत भास्कर, कॉन्स्टेबल समा तडवी आदींच्या पथकाने केली.
