पाचोरा शहरात पाच लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त : एकाविरोधात गुन्हा
अन्न व औषध विभागासह पोलिसांच्या कारवाईने खळबळ : शहरातील गुटखा तस्करी ऐरणीवर
Banned gutkha worth ₹5 lakh seized in Pachora city ; case registered against one person पाचोरा (3 जुलै 2026) : पाचोरा शहरात अन्न सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत चार लाख 98 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकाविरोधात दाखल करण्यात आला असून या कारवाईने अवैधरित्या गुटखा विक्री करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील आशीर्वाद रेसिडेन्सी परिसरात उभी असलेल्या एका चारचाकी वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच त्यांनी तत्काळ पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाईचे नियोजन केले.

यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, पोलीस कर्मचारी गजानन जोशी व बजुसिंग बंजारा यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संबंधित चारचाकी वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या डिक्कीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या गोण्या आढळून आल्या. त्यानंतर वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करून पाचोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आला. या कारवाईत चार लाख रुपये किंमतीची (एम.एच.14 जे.एम.0332) चारचाकी कार आणि त्यामधील चार लाख 98 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला असा एकूण आठ लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून प्रशांत राजाराम चौधरी (53, आशीर्वाद रेसीडेन्सी, पुनगाव रोड, पाचोरा) विरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायळ करीत आहेत.
