भुसावळ खुनाने हादरले : रेल्वे कर्मचार्‍यांच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारून हत्या

सात दिवसात दुसर्‍यांदा खून : संशयीताला लागलीच अटक : वाढती गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर


गणेश वाघ
Bhusawal Shaken by Murder : Railway Employee Killed by Blow of Iron Bar to the Head भुसावळ (4 जुलै 2026) : शहरातील आरपीडी रोडवरील मिलिटरी डेपोमागील कालिका मंदिराची स्वच्छता करणार्‍या 55 वर्षीय सेवेकर्‍याला हत्येला आठवडला उलटत नाही तोच भुसावळातील रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये काम करणार्‍या 58 वर्षीय कर्मचार्‍याची संशयीत आरोपीने डोक्यात लोखंडी पट्टी मारून हत्या केली. खुनाची घटना शनिवार, 4 रोजी रात्री साडेआठ वाजता उघडकीस आली. सलग सात दिवसानंतर दुसर्‍यांदा घडलेल्या खुनाच्या घटनेने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे तर शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा समोर आला आहे. प्रसाद यशवंत कुलकर्णी (58, स्टार लॉन, भारंबे नगर, भुसावळ) असे खून झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. संशयीत आरोपी आकाश भानुदास गोरखा (कवाडे नगर, भुसावळ) यास पोलिसांनी अटक केली आहे.

भंगार चोरीच्या वादातून घटनेचा संशय ?
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील कवाडे नगराजवळ रेल्वेचे फिल्टर हाऊस असून येथे कर्मचारी प्रसाद कुलकर्णी हे शनिवारी सायंकाळी कर्तव्यावर असताना रात्री साडेआठ वाजता संशयीत आकाश भानुदास गोरखा (कवाडे नगर, भुसावळ) हा आला व त्याने कर्मचार्‍याशी कुठल्यातरी कारणावरून वाद घालत कर्मचार्‍याच्या डोक्यात फिल्टर हाऊसमध्ये पडलेली लोखंडी पट्टी डोक्यात मारली. घाव वर्मी बसल्याने व रक्तस्त्राव झाल्याने कर्मचारी जागीच गतप्राण झाला.

आरोपीला अटक : दोन गुन्हे
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर दोन पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत तर 2021 पासून आजपर्यंत त्याच्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आहे.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
भुसावळात झालेल्या खुनाच्या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला व जळगाव येथून फॉरेन्सिक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

सात दिवसांपूर्वीच सेवेकर्‍याची हत्या : गुन्हेगारांच्या केंद्रस्थानी रेल्वेचे भंगार
अवघ्या सात दिवसांपूर्वी रविवार, 28 जून रोजी मध्यरात्री लष्करी डेपोमागील रेल्वे लाईनजवळील कालिका मंदिराचे सेवकरी संतोष रघुवीर मनचल (55, झेडटीआरआय परिसर, भुसावळ) यांची मारहाण करीत हत्या करण्यात आली होती. शहर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल करीत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. भंगार चोरट्यांना हटकल्याच्या वादातून हत्येचा प्रकार घडला होता. खून प्रकरणी क्षितीज संजय भालेराव (झेडटीसी, भुसावळ), प्रफुल उत्तम जाधव (रा. कोळीवाडा, जुना सातारा, भुसावळ) व हर्षल राजू वर्मा (झेडटीसी, भुसावळ) यांना आरोपींना अटक करण्यात आली होती. भुसावळात आतापर्यंत चार दिवसांच्या अंतराने झालेल्या दोन हत्येमागे शहरातील रेल्वेचे भंगार हेच केंद्रस्थानी आहे.

भंगार खरेदीदारांनाही करावे सहआरोपी
रेल्वेचा विस्तीर्ण व निर्जन असलेला परिसर व त्यातच रेल्वे सुरक्षा बलाची फारशी गस्त नसल्याने गर्दूल्ले तसेच सराईत गुन्हेगार भरदिवसा व रात्रीच्या वेळी भंगार चोरतात व नेहमीचे ठरलेले भंगार खरेदीदार हे भंगार स्वस्तात खरेदी करतात व त्यातून शहरात खुनांसारख्या घटना घडतात. भुसावळातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी या गुन्ह्यांमध्ये आता भंगार खरेदी करणार्‍यांना सहआरोपी करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासी मात्र धास्तावले आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !