चोरीच्या नऊ मोबाईलसह मालेगावातील अट्टल चोरटे धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या मोबाईल चोरीनंतर 24 तासात गुन्ह्याची उकल
Habitual thieves from Malegaon netted by Dhule City Police with nine stolen mobile phone धुळे (5 जुलै 2026) : धुळे शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत मालेगावातील दोन सराईत चोरट्यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून एकूण 9 चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून या मोबाईलची एकूण किंमत एक लाख 41 हजार 500 इतकी आहे.
काय आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जुलै रोजी पहाटे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कैलास सुरेश कुसंमुडे (22, चक्करबर्डी, धुळे) यांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सज्जाद अहमद सलीम अहमद (33) व अब्दुल रहमान कलीम अहमद (24, दोघेही रा.रमजानपुरा, मालेगाव, जि.नाशिक) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी धुळे शहरातील विविध ठिकाणांहून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून टेक्नो, रेडमी, विवो, एमआय आणि सॅमसंग कंपनीचे एकूण नऊ मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, इतर मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंत भामरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी, अंमलदार रवीकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, अमित रनमळे, तुषार पारधी, अमोल पगारे, रोहिणी पवार, सुदर्शन मोरे, प्रशांत नाथजोगी, धम्मपाल वाघ, दीपक जगताप, हिमांशू ठाकूर, राहुल सरदार, शाकीर शेख, शाहीद शेख आदींच्या पथकाने केली.
