एकाच कुटूंबातील पाच सदस्य दहा दिवसांपासून बेपत्ता
Five members of the same family missing for ten days. नागपूर (5 जुलै 2026) :नागपूरातील एकाच कुटुंबातील तब्बल पाच सदस्य गेल्या 10 दिवसांपासून अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. 24 जूनपासून हे सर्व जण गायब असून, या घटनेमुळे संपूर्ण धंतोली परिसरात आणि नागपूरच्या राजकीय-सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
धंतोली पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार हर्षा परसवानी (57 वर्षे), जितेंद्र परसवानी (42), इशिता परसवानी (40), खुशी परसवानी (वय 21 वर्षे), कृष्णा परसवानी (12) अशी बेपत्ता झालेल्या सदस्यांची नावे आहेत.

नातेवाईकांची शोधाशोध अपयशी
धंतोली परिसरात 71 वर्षीय तक्रारदार श्यामसुंदर परसवानी यांचे कुटुंब राहते. याच ठिकाणी त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्यही वास्तव्यास आहेत. 24 जून रोजी सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील वरील पाचही सदस्य कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले.
कुटुंब अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी तत्काळ त्यांच्या सर्व ओळखीच्या व्यक्तींकडे, मित्रपरिवाराकडे आणि इतर ठिकाणी कसून शोधाशोध केली मात्र सर्वांचे फोन बंद असल्याने आणि कुठेही माग लागत नसल्याने नातेवाईक प्रचंड घाबरले. अखेर श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलिस ठाण्यात धाव घेत सर्व जण बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवली.
शेवटचे लोकेशन पुण्याचे
धंतोली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने बेपत्ता सदस्यांच्या मोबाईल क्रमांकांचा माग काढला असता, पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचा सुगावा लागला आहे. या पाचही जणांचे ‘शेवटचे लोकेशन’ पुणे येथे दाखवत असल्याचे समोर आले आहे. या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांचे एक पथक तपासासाठी रवाना होण्याची शक्यता आहे.
आर्थिक विवंचनेतून पाऊल उचलल्याचा संशय
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील एका सदस्यावर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर होता. याच आर्थिक विवंचनेतून आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने अचानक घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय आहे.
