अजंदा रेल्वे पुलाजवळील लुटीचा 24 तासांत छडा : रावेरातील त्रिकूट जाळ्यात

मोटारसायकल व मोबाईल जप्त : जबरदस्तीने मोबाईलवरून पैसेही केले ट्रान्सपर


Robbery near Anjanda railway bridge solved within 24 hours: Trio from Raver nabbed रावेर (6 जुलै 2026) : रावेर तालुक्यातील अंजंदा गावाजवळ रेल्वे पुलाशेजारी मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून एका बांधकाम ठेकेदाराची लूट करणार्‍या तिघा आरोपींना रावेर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, मोबाईल तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एस आहे लूट प्रकरण
फिर्यादी शेख जाबीर शेख आमान (41, फारुकी आजम कॉलनी, चिनावल, ता.रावेर) हे बांधकाम ठेकेदार असून यांना नेहमीच कामासाठी मजूर लागतात. आमान यांना दोन मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अंजंदा येथे बोलावण्यात आले. ते रेल्वे पुलाजवळ पोहोचताच आरोपींनी चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, मोबाईल हिसकावून घेतला. तसेच मोबाईलचा पिन जबरदस्तीने विचारून खात्यातून टप्प्याटप्प्याने आठ हजारांची रक्कमही ट्रान्सपर करून घेण्यात आली.

गुन्ह्याचा तपास करताना रावेर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सापळा रचून तिघा आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या आरोपींना अटक
रावेर पोलिसांनी शेख मुस्तकीम शेख अकील (22, फत्तेह नगर, रावेर), शेख मोईन शेख नझीम (19, खिर्डी रोड, विवरा) व फैजल बेग हितायत बेग (19, शंकर प्लॉट, रावेर) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील दुचाकी (एम.एच.19 ई.डी.55580) आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपींपैकी शेख मोईन शेख नझीम हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही लुटीचे गुन्हे दाखल आहेत तर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथकातील हवालदार समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !