राज्यात मुसळधार पावसाचे नऊ बळी : जनजीवन विस्कळीत
मुंबई (6 जुलै 2026) : राज्यात संततधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन तर विस्कळीत झालेच आहे, पण त्याचबरोबर राज्याच्या विविध भागांत काही गंभीर दुर्घटनाही घडल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत तब्बल 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
उपनगरात सात जणांचा मृत्यू
मृतांपैकी आठ जणांचा मृत्यू भिंत कोसळल्यामुळे, तर एकाचा मृत्यू झाड अंगावर पडल्याने झाला आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरात भिंत पडून 6 जण आणि झाड पडून 1 जण अशा एकूण 7 जणांनी आपला जीव गमावला आहे. याशिवाय, पुणे आणि ठाणे येथेही भिंत पडण्याच्या दुर्घटनेत प्रत्येकी एका नागरिकाचा बळी गेला आहे. वाढत्या दुर्घटना पाहता, नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्ते वाहतुकीला फटका
मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मानखुर्द परिसरात तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू
मुंबईतील मानखुर्द परिसरात एक तीन मजली धोकादायक चाळ रिकामी करत असताना पावसाच्या तडाख्याने चाळीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव घरातील सामान आवरत असतानाच अचानक घर कोसळल्याने ढिगार्याखाली दबून पाच निष्पाप लहान मुलांसह एका महिलेचा (असे एकूण 6 जणांचा) जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत मानखुर्द पोलिसांनी गु. र. क्र. 425/2026 अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली.