आरपीएफ शेगावची तत्पर कारवाई : बेपत्ता विवाहितेची कुटुंबीयांशी सुखरूप भेट
Prompt action by RPF Shegaon : Missing married woman safely reunited with her family शेगाव (7 जुलै 2026) : भुसावळ रेल्वे विभागांतर्गत ’ऑपरेशन डिग्निटी’ मोहिमेला यश मिळाले आहे. हेल्पलाईन 139 वर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे आरपीएफ शेगावने बेपत्ता विवाहित महिलेचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
काय आहे नेमके प्रकरण ?
हेल्पलाईनवर मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा प्रशांत पाटील (24, श्रीजी टॉवरजवळ, बदलापूर वेस्ट, जि.ठाणे) ही विवाहिता घरातून बेपत्ता झाल्यानंतर मिसींग दाखल करण्यात आली व संबंधित महिलेचे लोकेशन शेगाव परिसरात असल्याचे समोर आले. त्यानंतर आरपीएफ शेगावचे सहाय्यक उपनिरीक्षक रंजन तेलंग यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवर शोधमोहीम राबविली. सुरुवातीला महिला आढळून न आल्याने शोध सुरूच ठेवण्यात आला.

सायंकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील प्रतीक्षागृहाजवळ संबंधित महिला बसलेली असल्याचे समजले. त्यानुसार तातडीने घटनास्थळी पोहोचून तिची ओळख पटविण्यात आली. दादर रेल्वे पोलिसांकडे तिच्या बेपत्ता झाल्याची नोंद असल्याची खात्री करण्यात आली. यानंतर दादर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन पंचांच्या उपस्थितीत सुपूर्दगीनामा तयार करून संबंधित महिलेला तिचा सख्खा भाऊ अमित राजेंद्र बोरसे (कल्याण, जि.ठाणे) यांच्या ताब्यात देण्यात आले.
या संवेदनशील आणि तत्पर कारवाईबद्दल महिलेच्या कुटुंबीयांनी आरपीएफ शेगाव तसेच एएसआय रंजन तेलंग यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. ‘ऑपरेशन डिग्निटी’ अंतर्गत आरपीएफने पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतची आपली बांधिलकी सिद्ध केली.