एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंना विचारले तुम्हाला मुख्यमंत्री केले तर….! अधिकार्‍याच्या उत्तराचे देशभरातून कौतुक


मुंबई (8 जुलै 2026) : राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांना, ‘नायक’ चित्रपटाप्रमाणे तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्री आणि सर्व अधिकार दिले, तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी अत्यंत संयत भूमिका मांडली. लोकशाही व्यवस्थेमध्ये कुणालाही अमर्याद अधिकार नसतात. मी नेहमी सांगतो की, एक शासकीय कर्मचारी म्हणून आपले काम सर्वोत्तम पद्धतीने करणे हीच आपली जबाबदारी आहे, असे मुंढे म्हणाले.

कठोर कारवाईचे सर्वत्र स्वागत
एफडीएचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळविरोधी कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध शहरांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणावर धाडी टाकण्यात आल्या. अस्वच्छ किचन, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि भेसळयुक्त उत्पादनांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, पनीर, दूध, दही, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात एफडीएने सुरू केलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत अधिक आक्रमक आणि सातत्यपूर्ण कारवाया होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडूनही या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांची बदली होणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. या चर्चेनंतर सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी त्यांना पदावर कायम ठेवण्याची मागणी केली. अखेर सरकारने अशा कोणत्याही बदलीचा निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला.

एक दिवसाचे मुख्यमंत्री होणार का?
मुंढे पुढे म्हणाले, समाजाला सक्षम करणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि व्यवस्थेत पारदर्शकता आणणे हेच महत्त्वाचे आहे. समाज जितका विकसीत होईल, तितका देश आणि देशातील प्रत्येक नागरिक विकसीत होईल. मला कोणतीही जबाबदारी दिली तरी त्या पदावरून व्यवस्था आणखी एक पाऊल पुढे कशी नेता येईल, काम अधिक पारदर्शक आणि परिणामकारक कसे करता येईल, यालाच माझे प्राधान्य असेल. मी एक शासकीय सेवक आहे आणि माझ्या अधिकारांच्या मर्यादा मला पूर्णपणे माहिती आहेत. लोक मला नायक म्हणत असतील तर त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

मुंढे यांच्या या उत्तरानंतर त्यांच्या प्रशासकीय कामकाजाइतकाच त्यांच्या विचारांचाही सोशल मीडियावर गौरव केला जात आहे. अधिकारापेक्षा जबाबदारी आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !