पाच हजारांची लाच घेताना जलसंधारण उपविभागाचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात
इंधन बिल मंजुरीसाठी स्वीकारली : लाच संशयीत धुळ्यातील रहिवासी
गणेश वाघ
Junior Clerk of Water Conservation Sub-division Caught in ACB Trap While Accepting ₹5,000 Bribe भुसावळ (9 जुलै 2026) : गाळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचे इंधन बिल काढण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना मालेगावातील उपविभागीय जलसंधारण, मृद व जलसंधारण उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ लिपिक श्रीकांत काशिनाथ पाटील (36, रामनगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) यास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, 8 जुलै 2026 सायंकाळी उशिरा करण्यात आली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या मित्राने आपले शेत सुपीक करण्यासाठी घोरपडी पाझर तलाव, ता.मालेगाव येथून गाळ काढण्याची परवानगी मिळावी यासाठी उपविभागीय जलसंधारण कार्यालयात अर्ज केला व या कामाची परवानगी शासनाकडून मंजूर करण्यात आली. कनिष्ठ लिपिक श्रीकांत पाटील यांनी गाळ काढण्यासाठी वापरण्यात येणार्या वाहनाचे इंधन बिल शासनाकडून मंजूर करून देण्यासाठी बुधवार, 8 जुलै रोजी पंचांसमक्ष पाच हजारांची लाच मागितली व तक्रार नाशिक एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानुसार आरोपीने मालेगावातील कार्यालयात बुधवारी सायंकाळच्या सुमारास पाच हजारांची लाच स्वीकारली व लागलीच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रफुल्ल माळी, हवालदार विलास निकम, समीर शेख आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर करीत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.