मराठवाड्यात खळबळ : मध्यरात्री अनेक जिल्ह्यांमध्ये जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के


परभणी (9 जुलै 2026) : मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांमधील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीतील शिरळी परिसरात 4.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मध्यरात्री जाणवले धक्के
नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर, निळा रोड या भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून भूकंपाची मालिकाच सुरू आहे. सतत होणार्‍या भूकंपामुळे नागरीक भयभित झाले आहेत. गुरुवारी ता. 9 पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून शिरली (ता. वसमत) हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून खोली 10 किलोमिटर आहे. त्यानंतर दुसरा धक्का 2.15 मिनिटांनी 3.6 रिश्टर स्केल, 2 वाजून 17 मिनिटांनी 3.9 रिश्टर स्केल, तर 3 वाजून 23 मिनिटांनी 4.1 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असूनत त्याचे केंद्रबिंदू काकडदाभा (औंढा नागनाथ) असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या भूकंपाचे धक्के वसमत, हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात अधिक तिव्रतेने जाणवले आहे. ग्रामीण भागातील गावकर्‍यांनी रात्र जागून काढली आहे. आमदरी येथे एका घराची भिंत कोसळली असून 10 ते 12 घरांना तडे गेले आहेत. तसेच पांगरा शिंदे गावात 50 ते 60 घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये : जिल्हाधिकारी
हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज असून स्थानिक यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊन नये आपत्कालीन परिस्थिती किंवा नुकसान आढळल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनीही समाजात भितीचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमातून पोस्ट करू नये.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !