पोलीस कर्मचार्याकडून कायदा धाब्यावर : पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरे लग्न
नांदेड (9 जुलै 2026) : नांदेड पोलीस दलातील प्रशांत गजभारे या पोलीस कर्मचार्याने पहिली पत्नी हयात असताना आणि कायदेशीर घटस्फोट न घेताच दुसरा विवाह थाटला. हे लग्न थांबवण्यासाठी गेलेल्या पहिल्या पत्नीला नवरदेवाच्या वेशातील पोलिसानेच लग्न मांडवात अमानुषपणे मारहाण केली व त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
फेसबुकवरील फोटोमुळे फुटले बिंग
नांदेड पोलीस दलातील कर्मचारी प्रशांत गजभारे यांचा 2022 मध्ये शारदा गजभारे यांच्याशी प्रेमविवाह झाला आहे. त्यांना दोन वर्षांची एक चिमुकली मुलगी देखील आहे. संसार सुरू असताना त्यांच्यात कौटुंबिक वाद होत होते. मात्र, हे वाद सुरू असतानाच 5 जुलै रोजी फेसबुकवर आपल्या पतीच्या दुसर्या विवाहाचे फोटो पाहून शारदा गजभारे यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पती दुसर्या लग्नाच्या बेतात असल्याचे समजताच शारदा गजभारे या आपल्या नातेवाईकांसह तात्काळ वसमत शहराजवळील ‘कृष्ण मंगल कार्यालयात’ पोहोचल्या. त्यांनी पतीला दुसरे लग्न का करत आहे? असा जाब विचारत हा विवाह थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र यामुळे संतापलेल्या, डोक्यावर बाशिंग आणि अंगावर नवरदेवाचा पोशाख असलेल्या प्रशांत गजभारे याने स्वतःच्या पहिल्या पत्नीवर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
हा संपूर्ण थरारक प्रकार मोबाईल कॅमेर्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये नवरदेवाच्या वेशातील पोलीस कर्मचारी महिलेला अमानुषपणे मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या शेकडो वर्हाडी आणि नातेवाईकांनी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला मात्र कोणीही ती मारहाण थांबवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.
मारहाणीत शारदा गजभारे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांनी हिंगोलीच्या वसमत शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पोलीस कर्मचारी प्रशांत गजभारे याच्यासह इतर 12 जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.