रेल्वे डब्याला बनवले हनीमुन सुट : तिकीट निरीक्षकाचे तत्काळ निलंबन
छत्रपती संभाजीनगर (9 जुलै 2026) : नवविवाहित जोडप्याने त्यांचा रेल्वे प्रवास खास बनवण्यासाठी फर्स्ट एसी कोचची सजावट करण्यासाठी ‘राहत रूम डेकोरेशन’ या खासगी डेकोरेटरला ऑनलाईन बुक केले मात्र याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर येताच रेल्वे प्रशासनाने तिकीट निरीक्षकाचे निलंबन केले आहे तर खाजगी डेकोरेटर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे प्रकरण
हा सर्व प्रकार 6 जुलै 2026 रोजी धावणार्या ट्रेन क्रमांक 11002 ’नंदिग्राम एक्स्प्रेस’मध्ये घडला. नवविवाहित जोडपे छत्रपती संभाजीनगरहून कारने जालना रेल्वे स्थानकावर पोहोचले. जोडपे ट्रेनमध्ये बसण्यापूर्वीच या डेकोरेटरने जालना स्थानकावर डब्यात अनधिकृतपणे प्रवेश केला. डेकोरेटरने संपूर्ण कोच लाल-पांढरे फुगे, हृदयाच्या आकाराचे शोभेचे साहित्य, गुलाबाच्या पाकळ्या आणि अप्पर बर्थवर आयलव्हयु असा संदेश लावून सजवला.

‘हनिमून कोच’ची इंटरनेटवर जोरदार चर्चा
कोच सजवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फर्स्ट एसीमधील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दक्षिण मध्य रेल्वेने एक्सवर निवेदन जारी करत या प्रकरणावर तातडीने कारवाई केली. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, डेकोरेटरचा कोचमधील प्रवेश पूर्णपणे अनधिकृत होता आणि ही एक अत्यंत गंभीर सुरक्षा त्रृटी आहे. या हलगर्जीपणाबद्दल ड्युटीवर असलेले मुख्य तिकीट निरीक्षक गिरीश कुमार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच, त्यांची सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वेचे सुरक्षा नियम काय सांगतात?
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, आरक्षित एसी डब्यांमध्ये केवळ वैध तिकीट असलेले प्रवासी आणि अधिकृत रेल्वे कर्मचारी यांनाच प्रवेशाची परवानगी असते. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला (खासगी डेकोरेटरसारख्या) अधिकृत परवानगीशिवाय कोचमध्ये प्रवेश देणे, हे सुरक्षेचे मोठे उल्लंघन मानले जाते. यामुळे प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.