नाशिक हादरले : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म
नाशिक (10 जुलै 2026) : नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळवण तालुक्यातील मोहनदरीतील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणार्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार घडला आहे. पीडीतेच्या नात्यातील मुलाने अत्याचार केल्यातून हा प्रकार घडला असून कळवण पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन मुलगा ताब्यात
पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केला ही विद्यार्थिनी गरोदर राहिली होती. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची बालसुधारगृहात रवानगी केली.

सुटीत गावी गेल्यानंतर अत्याचार
हा प्रकार आश्रमशाळेच्या आवारात घडलेला नाही, असा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला असून संबंधित विद्यार्थिनी जेव्हा सुट्यांवर आपल्या गावी गेलेली होती, त्याच काळात हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संबंधित विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती नाशिकचे आदिवासी विकास अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली.
आश्रम शाळेत दैनदिन आरोग्य तपासणी करताना एवढी मोठी बाब लक्षात का आली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.