रावेरात दरोड्यापूर्वीच ठाण्यातील आरोपींना बेड्या : तीन संशयीत पसार

पाठलागाअंती उधळला दरोड्याचा कट : आरोपींकडून नकली नोटांसह दरोड्याचे साहित्य जप्त


Accused from Thane arrested in Raver before dacoity; three suspects at large रावेर (10 जुलै 2026) : रावेरात शस्त्रानिशी दरोड्यासाठी आलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी पाठलाग करीत उधळला आहे तर दोन आरोपी जमावाच्या हाती लागल्याने त्यांना चांगलेच बदडून काढण्यात आले तर अन्य तीन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. आरोपींकडून नकली नोटांसह दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

संशयास्पद वाहनाची माहिती अन पोलिस अलर्ट
गुरुवार, 9 जुलै रोजी पाल दुर्गक्षेत्र येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण यांना पाल गावातून संशयास्पद इको कार रावेरकडे भरधाव जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कळवली व निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने रवाना करत दोन्ही बाजूंनी नाकाबंदीचे नियोजन केले. आभोडा गावाजवळ पोलिसांना संशयित वाहन दिसताच चालकाने भरधाव वेगाने पळ काढला. रावेर शहरातील आठवडे बाजार परिसरातून बर्‍हाणपूर रस्त्यावरील शेताकडे जाताना वाहन चिखलात अडकल्याने संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न फसला. यावेळी पोलिसांसह स्थानिक नागरिकांनीही पाठलाग केला. त्यापैकी तिघेजण शेतातून पसार झाले तर दोघांना नागरिकांनी पकडत चोपून काढले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोघांना सुरक्षित ताब्यात घेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दरोड्याचे साहित्य जप्त
वाहनाची तपासणी केली असता त्यामधून लोखंडी तलवार, टॉमी, पेंचिस, लाल मिरचीपूड, दोरखंड, सुमारे तीन लाख रुपये दर्शनी मूल्याच्या चिल्ड्रन बँकेच्या बनावट नोटा तसेच इको कार (एम.एच.19 ई.ए.2403) जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात संशयित रावेर शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

दोन अटकेत तर तीन पसार
निखील प्रवीण पाटील (20) व अल्ताफ जलाल शेख (26, दोघे रा. साईनगर, घोडबंदर रोड, कासार वडवली, जि. ठाणे) यांना अटक करण्यात आली तर साथीदार मेहरबान जहांगीर तडवी (रा. पाल) याच्यासह अन्य दोन साथीदार पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे.या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या टोळीचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का, ते कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या उद्देशाने गुन्हा करण्याच्या तयारीत होते, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यांनी उधळला दरोड्याचा कट
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच रावेर गुन्हे शोध पथकातील समाधान ठाकूर, ईश्वर चव्हाण, सुनील वंजारी, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, संतोष इदा आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !