भुसावळात भाजपाच्या प्रभारीराजमध्ये पालिकेची सभा 16 जुलैला : विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
सभेच्या अजेंड्यावर 300 विषय : संकुल दुरुस्तीसह चार्जिंग स्टेशन होणार
Municipal Council meeting in Bhusawal on July 16 under BJP’s ‘in-charge’ regime ; all eyes on the opposition’s stance भुसावळ (11 जुलै 2026) : भुसावळ पालिकेतील प्रभारी राज व विधानपरिषद निवडणुकीच्या अचारसंहितेमुळे रखडलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त गवसला आहे. गायत्री भंगाळे अपात्र झाल्यानंतर भाजपच्या प्रभारीराज मधील पहिलीच सर्वसाधारण सभा गुरुवार, 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर 300 विषय घेण्यात आले आहेत. या सभेत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भूमिका काय असेल ? याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
प्रभारीराजमधील पहिलीच सभा
नगराध्यक्ष पदावरुन गायत्री भंगाळे अपात्र झाल्यानंतर सध्या पालिकेचा प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार शैलजा नारखेडे यांच्याकडे आहे. भाजपच्या प्रभारी सत्ताकाळात सर्वसाधारण सभा घेवून कामांना गती देण्याचे नियोजन केले होते मात्र याच दरम्यान विधानपरिषदेची आचारसंहिता लागल्याने सभा घेता आली नाही. यानंतरही प्रशासनाकडे एसआयआरची कामे, प्रभारी मुख्याधिकारी असल्याने सभा होऊ शकली नाही. अखेर पालिकेने या रखडलेल्या सभेचे नियोजन केले आहे. 16 जुलैला होणार्या या सभेच्या अजेंड्यावर 300 विषय घेण्यात आले आहेत.
तहकूबच्या हायट्रीकनंतर सभा
पालिकेच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर 3 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेतील 250 पैकी 177 विषयांना भाजपने विरोध दर्शवल्याने हे विषय जिल्हाधिकार्यांनी तहकूब केले होते. पंचवार्षिक काळातील दुसरी सर्वसाधारण सभा 13, 17 व 23 मार्च या दिवशी सलग तिसर्यांदा तहकूब करण्यात आली होती. यानंतर पालिकेची सभाच झाली नाही. सत्तांतरानंतर आता तीन महिन्यांच्या कालखंडानंतर ही सभा होत आहे.
सभेच्या अजेंड्यावर हे विषय
शहरातील पालिका संकुलांची डागडूजी करणे, माझी वसुंधरा योजनेतून विविध ठिकाणी इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन बसवणे, जलशुध्दीकरण केंद्रात 400 केव्हीए ट्रान्सफार्मर खरेदी करणे, हायमास्ट दिवे दुरुस्ती करणे, अष्टभुजा मंदिरासमोरील दुभाजक सुशोभिकरण करणे, रस्ते झाडण्यासाठी मशिन खरेदी, बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ छत्रपती संभाजी महाराज पुतळा बसविण्यासाठी प्रस्ताव करणे यासोबत काही कामांना मुदतवाढ व प्रभागांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते, पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.
