यावल शहरातील विस्तारित भागात मान्सूनपूर्व स्वच्छतेचे कामे करा : नगरसेविका अंजुम बी. खान यांची मागणी
यावल (11 जुलै 2026) : यावल शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मान्सूनपूर्व कामे झालीच नाही परिणामी आयेशा नगर भागातील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण कचरा साचला आहे. पावसाच्या पाण्यामुळे ओला झालेल्या या कचर्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी या भागात पसरत आहे. त्यातून डासांची उत्पत्ती होत नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. मोठा पाऊस झाला तर या नाल्यातील पाणी नागरी वस्तीत शिरेल, अशी शक्यता आहे. नगरपालिका प्रशासनाने या नाल्यांची तत्काळ सफाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कदीर खान व नगरसेवक अंजुमबी खान यांनी केली आहे.
गाळ व कचर्याने नाला तुंबला
शहरात वार्ड क्रमांक 2 मधील नाला पूर्णपणे गाळ व कचर्याने तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर व परिसरात साचत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नगरसेवक अंजुमबी कदीर खान व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कदीर खान यांनी सांगितले की, या समस्येबाबत अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला तोंडी माहिती देण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच डासांची वाढ, दुर्गंधी आणि साथीच्या रोगांचा धोका वाढल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने तातडीने नाल्याची साफसफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
तत्काळ सफाई करा
पाऊस पडतोय, नाले तुंबलेत, नागरिक त्रस्त आहेत.पण नगरपालिका अजूनही झोपेत आहे का? नागरिकांच्या अडचणींपेक्षा प्रशासनाची निष्क्रियता मोठी झाली आहे. आता तरी जागे व्हा आणि वार्ड क्रमांक 2 मधील नाल्याची तातडीने साफसफाई करा! अशा संतप्त प्रतिक्रिया नगरसेविका अंजुम बी खान व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कदीर खान यांनी दिली आहे.
स्वच्छतेला सुरुवात
नगरपालिकेत नगरसेविका आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तक्रारीची नगरपरिषद च्या मुख्याधिकार्यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या भागात बुधवारी नाले सफाईला सुरुवात केली आहे. जेसीबी आणि स्वच्छता कर्मचार्यांना पाठवून या भागात स्वच्छता सुरू झाली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कदीर खान यांनी स्वतः उभे राहून आता स्वच्छता आणि नालेसफाई करून घेतली आहे.
