भुसावळात मोकाट कुत्र्यांविरोधातील मोहिम ठरतेय फार्स : दोन दिवसात चौघांवर हल्ले
Campaign against stray dogs in Bhusawal turns into a farce: Four people attacked in two days भुसावळ (11 जुलै 2026) : शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अलीकडेच नारायणनगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात तारकेश विशाल झोपे (9) या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर टीकेची झोड उठली होती. पालिकेने मोकाट कुत्र्यांविरोधात कंत्राट दिल्यानंतर सुरूवातीला काही भागातून कुत्रे पकडण्यातही आले मात्र मोहिम थंडावताच पुन्हा शहरातील विविध भागातून श्वानदंशाचे प्रकार समोर येवू लागल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष पसरला आहे. पालिकेची ही मोहिम दिखावा ठरल्याची उघड टीका नागरिक करीत आहेत.
दोन दिवसात चार ठिकाणी कुत्र्यांचे हल्ले
शुक्रवार, 10 रोजी शहरातील नेब कॉलनीत मोकाट कुत्र्याने बालकाच्या कानाला चावा घेतला तर कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, नेब कॉलनी परिसर, काशीविश्वनाथ मंदिर, देना नगर भागातही श्वानदंशाच्या घटना घडल्या. मोकाट कुत्र्यांवर कारवाईचे एकीकडे सांगितले जात असताना दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर कुत्र्यांकडून सर्रास हल्ले सुरू असल्याने पालिकेची ही मोहिम केवळ फार्स (देखाव) ठरल्याची टीका नागरिक करीत आहेत.
नागरिक पुन्हा धास्तावले
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणार्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अस्वच्छतेमुळे पोषक वातावरण
गल्ली बोळामध्ये एकत्र येऊन कुत्रे चारचाकी वाहन, दुचाकीस्वार,लहान मुले, मुली वृद्ध नागरिक, महिला यांच्या मागे चावा घेण्यासाठी पळतात. शहराचा वाढता विस्तार रस्त्यांवरील अस्वच्छतेमुळे कुत्र्यांना पोषक वातावरण मिळाले असून त्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
या भागात वाढले मोकाट कुत्रे
शहरातील जळगाव रोडवरील तीन नंबर पेट्रोल पंप ते जुना सातारा, यावल रोडवरील राहुल नगर, साईचंद्र नगराजवळील प्रवेशद्वार परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. रात्री-बेरात्री बालकांसह वयोवृद्धांच्या अंगावर धावण्याचे तसेच वाहनामागे ही कुत्रे धावत असल्याने अपघाताची भीती आहे. लाखो रुपये खर्चून पालिका मोकाट कुत्रे पकडण्याचे टेंडर एकीकडे देत असताना दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्रे नागरिकांना चावा घेत असल्याने प्रत्यक्षात ही निधीची उधळपट्टी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित करण्यास वाव आहे.
