भुसावळ नगरपालिकेत एसी बसविण्याच्या माहितीवर आरटीआयचा वाद

अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप ; संपूर्ण कागदपत्रांसाठी प्रथम अपील दाखल


RTI dispute over information regarding the installation of ACs at the Bhusawal Municipal Council भुसावळ (11 जुलै 2026) : भुसावळ नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील विविध दालनांमध्ये बसविण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रणा (एसी) संदर्भातील माहिती अधिकार (आरटीआय) अर्जावर अपूर्ण व असमाधानकारक माहिती देण्यात आल्याचा आरोप करत अर्जदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी प्रथम अपील दाखल केले आहे. माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत मागविण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांबाबत नगरपालिकेकडून स्पष्ट माहिती न दिल्याचा दावा अपीलमध्ये करण्यात आला आहे.

माहिती अधिकार अर्जाद्वारे अर्जदारांनी नगरपालिकेच्या कार्यालयात बसविण्यात आलेल्या एसी यंत्रणांसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मान्यता, एसी खरेदी व बसविण्याचा खर्च, संबंधित अधिकार्‍यांचे वेतन स्तर, मागील दोन वर्षांचे वीज बिल, तसेच एसी यंत्रणांमुळे विद्युत भार (इलेक्ट्रिकल लोड) किती वाढला याबाबतची माहिती मागितली होती.

नगरपालिकेकडून दिलेल्या उत्तरात काही कालावधीतील वीज बिलांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली मात्र एसी बसविल्यानंतर विद्युत भारात किती वाढ झाली, त्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत नोंद अथवा तांत्रिक तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.

याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (इलेक्ट्रिकल) तांत्रिक मान्यतेसंदर्भातील कागदपत्रे, विशेष परवानगी तसेच संबंधित मंजुरीबाबत माहिती उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे त्यामुळे मागविलेली माहिती अपूर्ण असून माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींनुसार संपूर्ण माहिती देणे आवश्यक असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी समाधानकारक माहिती न मिळाल्याने प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी 9 जुलै 2026 रोजी माहिती अधिकार कायद्यानुसार प्रथम अपील प्राधिकरणाकडे अपील दाखल केले आहे. संबंधित सर्व कागदपत्रांची प्रमाणित प्रत व मागविलेली संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी अपीलद्वारे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात प्रथम अपील प्राधिकरण कोणता निर्णय घेते, नगरपालिकेला संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश दिले जातात का आणि एसी बसविण्याच्या प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक केली जातात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !