आमदार एकनाथराव खडसेंनी स्पष्टच सांगितले ; राष्ट्रवादीतच राहणार, भाजपात जाण्यासाठी इंटरेस्ट नाही
अमित शहांनी पक्ष प्रवेशासाठी त्यावेळी ऑफर दिल्याचा दावा : स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याचा दावा
गणेश वाघ
MLA Eknathrao Khadse has stated clearly that he will remain with the NCP and has no interest in joining the BJP भुसावळ (रविवार, 12 जुलै 2026) : भाजपात प्रवेश करण्याबाबत आता कुठलाही इंटरेस्ट नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी रविवारी मुक्ताईनगरात माध्यमांशी बोलताना केला आहे. अलीकडे आमदार खडसे भाजपात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका मांडली आहे.
भाजपा नेत्यांच्या भेटीने वाढल्या प्रवेशाबाबत चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश अर्थात घरवापसी करीत असल्याच्या हल्ली राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आमदार खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी होणार्या वाढदिवसानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात नाथाभाऊंचा जाहीर भाजप प्रवेश होणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. त्यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत एक महत्त्वपूर्ण भेट झाली व त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचीदेखील भेट घेतल्याने या भेटीनंतर तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

खडसेंचा दावा : अमित शाहंकडून पक्ष प्रवेशाची ऑफर
आमदार एकनाथराव खडसे यांनी थेट दिल्लीचा संदर्भ देत अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजपा पक्षश्रेष्ठी अमित शाह यांनी आपल्याला दिल्लीत फोन करून बोलावल्यानंतर आपण दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी शाह यांनी ‘भाजप जॉईन करो’ म्हटले होते मात्र मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले की, ‘तुम्हाला जर पक्षात प्रवेश दिला, तर स्थानिक लोक काम करणार नाहीत.’ ‘खडसेंना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेची जागा पाडून टाकू’ असे थेट ब्लॅकमेलिंग केले जात असल्याने याच कारणामुळे वरिष्ठांनी मला सांगितले की, ‘तुम्ही लोकसभेत आमचे काम करा, पुढे पाहू’ मग माझ्या पक्षप्रवेशाला नेमका विरोध करतोय कोण? असा थेट सवाल खडसेंनी उपस्थित केला.
भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाही
रविवारी मुक्ताईनगरातील माध्यमांशी बोलताना आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपात जाण्याच्या चर्चांवर पुन्हा पुर्णविराम लावला. ते म्हणाले की, मी शरद पवारांसोबतच राहणार असून आता भाजपात जाण्याचा कुठलाही इंटरेस्ट नाही. मी शरद पवार यांच्यासोबत असून शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहे. माझे कार्यकर्ते हे भाजपमध्ये जातील, मी नाही. माझे कार्यकर्ते इच्छुक आहेत, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
