भुसावळातील जाम मोहल्ल्यात जीर्ण इमारत कोसळली : सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

शहरातील जुन्या इमारतींचा पावसाळ्यात पुन्हा प्रश्न ऐरणीवर


Dilapidated building collapses in Bhusawal’s Jam Mohalla; fortunately, a major loss of life was averted भुसावळ (13 जुलै 2026) : भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात जमाते इस्लामी कार्यालयासमोर असलेली रज्जाक मिस्त्री यांची जुनी व जीर्ण दोन मजली इमारत रविवार, 12 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र इमारत कोसळली त्यावेळी त्यात अथवा आजूबाजूला कोणतीही व्यक्ती नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

सुदैवाने टळली जीवीतहानी
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळताना मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच परिसरात मोठी गर्दी झाली. ढिगार्‍याखाली कोणी अडकले आहे का, याची नागरिकांनी खात्री करून घेतली. सुदैवाने कोणतीही व्यक्ती ढिगार्‍याखाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारत सुमारे 50 वर्षे जुनी होती. कालांतराने ती अत्यंत जीर्ण झाली होती. इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते आणि तिची अवस्था धोकादायक बनली होती. अखेर रविवारी सायंकाळी ही इमारत अचानक जमीनदोस्त झाली.

नागरिकांसह नगरसेवकांची धाव
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नगरसेवक आसिफ शेख उर्फ मका व सामाजिक कार्यकर्ते इम्रान इकबाल बागवान (पहेलवान) यांनी तत्काळ नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच भुसावळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नगर रचनाकार तथा बांधकाम अभियंता अंकुश गोसावी, अग्निशमन दलाचे प्रशांत भोळे, हितेश रायपुरकर आणि दिगंबर येवले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ढिगार्‍याखाली कुणी अडकले आहे का याची खातरजमा केल्यानंतर परिसरात लाऊड स्पीकरद्वारे नागरिकांना इमारतीच्या जवळ जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले.

पालिका प्रशासनाची धाव
दरम्यान घटनास्थळी बाजारपेठ पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान इमारतीच्या परिसराचा ताबा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या विभागाने घेतला असून सदर इमारत पूर्णपणे पाडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नियोजन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरात कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन करण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.

जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर शहरातील इतर जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करावी, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !