भरधाव ट्रकची पालखी सोहळ्यातील भाविकांना धडक : तीन महिला वारकरी जागीच ठार
जेजुरी (13 जुलै 2026) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकर्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकर्यांचा मृत्यू झाला असून अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
असा घडला अपघात
सध्या राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे ऊन-पावसाची तमा न बाळगता पायी निघाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडचा मुक्काम आटोपून सोमवारी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. सकाळच्या वेळी अनेक वारकरी जेजुरीच्या दिशेने पायी चालत निघाले होते. या मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव एकाच बाजूने वाहने सोडली जात होती.

प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी नजीकच्या भोंगळे मळा परिसरात मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने वारकर्यांच्या टेम्पोला आणि पायी चालणार्या वारकर्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात तब्बल सहा वारकरी चिरडले गेले.
तीन महिला वारकर्यांवर काळाचा घाला
अपघात घडताच परिसरातील नागरिक आणि इतर वारकर्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या सर्व सहा वारकर्यांना तातडीने नजीकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान यापैकी तीन महिला वारकर्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर उर्वरित तीन जखमी वारकर्यांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमी वारकर्यांच्या उपचारात कसूर नको : सुनेत्रा पवार
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकर्यांचा मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःख व्यक्त केले. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी मृत वारकरी भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. तसेच जखमी वारकरी भगिनींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
सुनेत्रा पवार यांनी जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात भेट घेत उपचारांची माहिती घेतली. त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. पंढरीच्या वारीदरम्यान वारकर्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
