भुसावळात सात दिवसीय ‘श्रीराम कथे’चा भक्तीमय वातावरणात समारोप

प्रभू श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकाचा सजीव देखावा ठरला मुख्य आकर्षण : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महायज्ञ


भुसावळ (13 जुलै 2026) : श्री लक्ष्मी व्यंकटेश बालाजी मंदिरात 7 जुलैपासून भक्तीभावाने सुरू असलेल्या सात दिवसीय श्रीराम कथेचा सोमवार, 13 जुलै रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात समारोप झाला. कथेच्या अंतिम दिवशी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भाविकांनी सादर केलेला प्रभू श्रीरामजींच्या राज्याभिषेकाचा हुबेहूब आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सजीव देखावा.

या कथेमध्ये सुप्रसिद्ध प्रवचनकार मदन मोहन महाराज यांनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामजींच्या आदर्श जीवनावर,त्यांच्या मूल्यांवर आणि विविध प्रसंगांवर अत्यंत रसाळ भाषेत निरूपण केले. महाराजांच्या सुश्राव्य वाणीने कथा श्रवण करताना उपस्थित भाविक भक्तीसागरात दंग झाले होते.

सजीव देखाव्याने वेधले लक्ष
कथेच्या शेवटच्या दिवशी आयोजित श्रीराम राज्याभिषेकाच्या सजीव देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात प्रभू श्रीराम,लक्ष्मण, माता सीता आणि अनन्य भक्त हनुमानजींच्या वेशभूषेत हुबेहूब साकारलेल्या पात्रांनी उपस्थितांची मने जिंकली. या बाल आणि युवा कलाकारांच्या वेशभूषेवर व सादरीकरणावर संपूर्ण वेळ भाविकांची नजर खिळून राहिली होती.

महायज्ञाने कथेची सांगता व महाप्रसाद
कथा समाप्तीचे औचित्य साधून मंदिरात भव्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी तथा प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे तसेच राधेश्याम लाहोटी आणि विना लाहोटी यांच्या हस्ते मुख्य यजमान म्हणून पूर्णाहुती व महायज्ञ संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या भक्तीमय सोहळ्याला भुसावळ शहर व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय अग्रवाल, मयूर नागोरी, गोटू लाहोटी, गोविंद हेडा, राजेश लढ्ढा, दीपक काबरा, राजू चांडक, जी.आर.ठाकूर, राजेश अग्रवाल, जे.बी.कोटेचा, सोना काबरा, मीना अग्रवाल, संजय चांडक, अयोध्यादेवी मंत्री, प्रिया अग्रवाल, निर्मला चौधरी, भारती राठी, प्रीती हेडा, कशीश काबरा, निकुंद हेडा यांच्यासह शेकडो भाविकांनी हजेरी लावली. बालाजी मंदिर परिसराला या कथेमुळे महोत्सवाचे स्वरूप आले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !