भरधाव कार रिक्षाला समोरून धडकली : वरणगावातील युवक ठार
कुर्हा गावाजवळ अपघात : कारचालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Speeding car rams head-on into auto-rickshaw: Youth from Varangaon killed भुसावळ (गुरुवार, 16 जुलै 2026) : भरधाव वेगाने जाणार्या कारने समोरून रिक्षेला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वरणगावातील रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात भुसावळ तालुक्यातील कुर्हा गावाजवळ मंगळवार, 14 जुलै दुपारी घडला. कारचालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भरधाव कारच्या धडकेने अपघात
मंगळवारी दुपारी सुमारे 3.30 वाजेच्या सुमारास कु-हा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर संशयीत आरोपी मनिष संघवे याने कार (एम.एच.19 सी.व्ही.7081) भरधाव वेगात व रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत समोरनू येणारी रिक्षा (एम.एच.20 ई.के.3440) जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालक हर्षल प्रकाश गायकवाड (28, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.


अपघात प्रकरणी प्रकाश जुलाल गायकवाड (57, वरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीष अदिनाथ संघवे (43, रा.खेडी बु.॥, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारचेही नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धीरज मंडलिक करीत आहेत.