भुसावळातील प्रभारीराजमधील सभेत 299 विषयांना मंजुरी : मोकाट कुत्रे, उघड्यावरील मांस विक्रीसह पथदिव्यांचा प्रश्न गाजला
शहरातील नाले सफाईसह शहर विकासाच्या विषयांना सभागृहाची मंजुरी ः विरोधकांनी फिरवली पाठ, सभा बेकायदेशीर असल्याचा केला दावा
गणेश वाघ
299 items approved at the meeting held under the ‘acting administration’ in Bhusawal; issues regarding stray dogs, the sale of meat in the open, and streetlights took center stage भुसावळ (गुरुवार, 16 जुलै 2026) : भाजपा सत्ताकाळातील प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत एक विषय वगळता 299 विषयांना सत्ताधार्यांनी बहुमतांनी मंजुरी दिली. शहरातील मोकाट कुत्रे, 24 तास सुरू असलेले पथदिवे तसेच उघड्यावर होणारी मांस विक्री व नाल्यांमध्ये टाकण्यात येणारी घाणीवरून सत्ताधार्यांनी पालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी पालिका मुख्याधिकार्यांनी दोषींविरोधात ठोस कारवाईचे आश्वासन दिले. पालिकेतील विरोधी गट असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी सभेच्या एक दिवसापूर्वीच जिल्हाधिकार्यांना निवेदन देत सभा बेकायदेशीर असल्याचे म्हणत सभेकडे पाठ फिरवली.
यांची होती उपस्थिती
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे होते. व्यासपीठावर गटनेता युवराज लोणारी, प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे उपस्थित होते.


शहरातील उद्यांनाची दुरवस्था
नगरसेवक किरण कोलते म्हणाले की, महापुरूषांच्या नावाने असलेल्या शहरातील सर्वच उद्यानांची दुरवस्था झाली आहे. गतवेळी कंत्राट देण्यात आले मात्र पालिका अधिकार्यांनी ढुंकूनही या उद्यानांकडे पाहिले नाही. दोषी अधिकारी व कंत्राटदारा व संबंधितांचे बिल काढणार्यांवर कारवाई हवी.
चुकीच्या सर्वेचा फटका नागरिकांना
नगरसेवक गिरीश महाजन यांनी घरपट्टी संदर्भात मागच्या वेळी चुकीच्या पद्धत्तीने केलेल्या सर्वेवर बोट ठेवले. नगरसेवक बबलू बर्हाटे यांनी शहरातील पालिकेच्या संकुलांची दुरुस्ती करताना शौचालयांची दुरुस्ती करून ते पे अॅण्ड युज तत्वावर चालवण्यासाठी देण्याचे सूचवले.
नाल्यांमध्ये घाण टाकणार्या व्यापारी व दुकानदारांवर हवी कारवाई
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी आक्रमकपणे शहरातील रखडलेल्या नालेसफाईकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, पांडुरंग टॉकीजजवळ रेती व्यावसायीक गाळलेली रेती थेट नाल्यात टाकतो त्यामुळे नाला तुंबत असल्याने त्याच्यावर कारवाई हवी. शहरातील विविध भागातील नाले सफाईचे छायाचित्रे त्यांनी सभागृहात झळकावली. यास जवाबदारी काही व्यापारी व हातगाडीवर साहित्य विक्री करणारे विक्रेते असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. दरवर्षी 80 लाख रुपये नालेसफाईवर खर्च होतात मात्र आताच उपाययोजना केल्यास अनाठायी खर्च वाचेल, असे ते म्हणाले. अमृत योजनेला किमान अडीच वर्ष लागतील मात्र तोपर्यंत पर्यायी प्रश्न कसा सोडवता येईल, याबाबतचे मॉड्यूल कोठारींनी सभागृहाला सांगितले.
उघड्यावर मांस विक्रीचा प्रश्न गाजला
शहरातील विविध भागात उघड्यावर होणार्या मांस विक्रीचा प्रश्न चांगलाच गाजला. नगरसेविका सोनल महाजन, गिरीश महाजन, पिंटू कोठारी, विशाल नाटकर आदींनी याप्रश्नी आवाज उचलत विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली. विक्रेते मांस विक्रीनंतरचा कचरा थेट नालीत टाकल्याने दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात येत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
24 तास पथदिवे सुरूच
शहरातील अनेक भागात 24 तास पथदिवे सुरू असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावर टायमर बसवण्याचे आश्वासन देण्यात आले. नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी जुन्या मॅन्युअल पद्धत्तीने कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली. विशाल नाटकर यांनीही या मुद्यावर प्रकाश टाकला.
या विषयांना मिळाली मंजुरी
शहरातील मोकटा गुरांचा बंदोबस्त, शहरातील नालेसफाई, महापुरूषांच्या पुतळा परिसरात विद्युत रोशनाई, शहरातील विविध उड्डाणपुलांना महापुरूषांची नावे, जलकुंभाची दुरुस्ती व डागडूजी, पालिका संकुलांची दुरुस्ती, डागडूजी, वॉटरप्रुफींग, विविध भागात रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हरब्लॉक, ठिकठिकाणी सिमेंटर बेंचेस बसवणे आदी 299 विषयांना मंजुरी मिळाली. एलईडी दिवे देखभाल दुरुस्तीचा विषय क्रमांक 37 एकमताने नामंजूर करण्यात आला.