फत्तेपूर पुन्हा हादरले : महिलेवर सामूहिक अत्याचार : चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल


फत्तेपूर, जि.जळगाव (गुरुवार, 16 जुलै 2026) : फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 29 जून रोजी 40 वर्षीय महिलेवर गँगरेप झाल्याचा प्रकार सोशल मिडीयात व्हायरल झालेल्या व्हिडिओने समोर आला होता तर या प्रकरणात 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. 18 दिवसांच्या अंतराने दुसरी घटना समोर आल्याने समाजमन चिंतीत झाले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रस्त्याने पायी जात असताना मुख्य संशयीताने अन्य संशयीताच्या मदतीने महिलेला जबरदस्तीने दोरीने बांधले. त्यानंतर तिला वाहनातून जवळील ओढा (नाला) परिसरात नेत तेथे चारही आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा तसेच घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व आरोपी हे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या परिचयातील आहेत. आरोपींपैकी एकाचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय असून, पीडितेच्या पतीकडे ट्रॅक्टर भाड्याचे सुमारे एक लाख रुपये थकीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आर्थिक व्यवहाराचा घटनेशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

18 दिवसांपूर्वीच व्हिडिओ आला समोर
सोमवार, 29 जून 2026 रोजी 40 वर्षीय विवाहितेवर गँगरेपचा प्रकार व्हायरल व्हिडिओने समोर आणला होता. 15 संशयीतांपैकी दोघांनी धमकावून महिलेवर सामूहिक अत्याचार केला तर उर्वरीत संशयीतांनी आरोपींना आवर घालण्याऐवजी घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते.ही घटना काही महिन्यांपूर्वीची असलीतरी एका आरोपीने घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारीत केला व सोमवार, 29 जून रोजी फत्तेपूर पोलिसांपर्यंत व्हिडिओ पोहोचल्यानंतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत 15 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करीत 14 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !