भडगावातील फायनान्स कर्मचार्‍याकडील 51 हजारांची बॅग लांबवली : पाच आरोपींना जळगाव गुन्हे शाखेकडून अटक


Bag containing ₹51,000 stolen from finance company employee in Bhadgaon; five accused arrested by Jalgaon Crime Branch जळगाव (गुरुवार, 16 जुलै 2026) : भडगाव शहरात फायनान्स कंपनीत काम करणार्‍या तरुणाकडील 51 हजार 560 रुपयांची रोकड असलेली बॅग लांबवण्यात आल्याची घटना 10 जुलैला घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक नेटवर्कच्या आधारे पाच आरोपींना अटक केली तर गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त करण्यात आली.

काय आहे प्रकरण
शुक्रवार, 10 जुलै रोजी फिर्यादी यश हिरामण हटकर (शिवनेरी गेट, भडगाव) यांच्याकडील 51 हजार 560 रुपयांची रोकड असलेली बॅग धूम स्टाईल लांबवण्यात आली. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना भडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी उदय छोटे गायकवाड (22, रा.अजनकवाडी, ता.धुळे), अनिल दिलीप पाटील (31, रा.पळासखेडा, ता.भडगाव), विशाल मधुकर गांगुर्डे (26, पूर्वीपाडा, ता.जि.धुळे), निलेश अण्णा पवार (20, अनकवाडी, जि.धुळे) व योगेश प्रकाश पवार (22, रा.अजनकवाडी, ता. जि. धुळे) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. गुन्ह्यातील अन्य संशयीतांचा कसून शोध सुरू आहे. आरोपींना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार करीत आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, रिजवान शेख आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !