जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : धावत्या लक्झरीतून सराफाचे 25 लाख लांबवणारी स्थानिक टोळी गजाआड
गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त : टोळी प्रमुखावर सात गुन्हे ; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त
Major crackdown by Jalgaon Crime Branch: Local gang arrested for stealing ₹25 lakh worth of bullion from a moving luxury bus जळगाव (गुरुवार, 16 जुलै 2026) : लक्झरीने प्रवास करणार्या जळगावातील सराफा व्यावसायीकाकडील कुरीयर कर्मचार्याची 25 लाखांची रोकड लांबवण्यात आली होती. ही घटना फर्दापूरजवळील हॉटेल साई सुरूची लॉजिंग अॅण्ड रेस्टारंटबाहेर 11 जुलैला घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसात जळगाव गुन्हे शाखेने गुन्ह्याची उकल करीत जळगावातील चौकडीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून 25 लाखांची रोकड व पाच लाखांची कार जप्त करण्यात आली.
जळगावातील टोळी जाळ्यात
सोनू उर्फ राम भगवान सारवान (32, गुरुनानक नगर, शनीपेठ, जळगाव), शेख रहेमान शेख निसार (33, बिल्डींग नंबर सात, रूम नंबर 48, पिंप्राळा हुडको, जळगाव), सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे (38, शारदा आश्रमशाळेजवळ, कोल्हे नगर, जळगाव) व दशरथ सुरेश चौधरी (36, गणपती मंदिराजवळ, खंडेराव नगर, पिंप्राळा, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.


असे आहे प्रकरण
जळगावातील प्रफुल्ल भागचंद सुराणा (जैन) यांचे जळगावातील सराफा बाजारात सुवर्ण दागिण्यांचे दुकान असून त्यांच्याकडे नितीन पुरूषोत्तम वाणी (कासारा गल्ली, पारोळा, जि.जळगाव) हे 15 वर्षांपासून खाजगी कुरियरचे काम करतात. शनिवार, 11 जुलै रोजी ते सायंकाळी साडेसहा वाजता जळगावहून हरेकृष्णा ट्रॅव्हल्सने कोल्हापूरला चांदी घेण्यासाठी निघाले होते व सोबत 25 लाखांची रोकड बाळगून होते. फर्दापूरजवळील हॉटेल साई सुरूची लॉजिंग अॅण्ड रेस्टारंटबाहेर शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजता थांबल्यानंतर वाणी हे जेवणासाठी गेले मात्र बॅग यावेळी ट्रॅव्हल्समध्ये राहिली व चोरट्यांनी संधी साधून 25 लाखांची रोकड लांबवली. वाणी हे काही वेळेनंतर आल्यानंतर त्यांना रक्कम चोरीचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचित केले.
गोपनीय माहितीच्या आधारे टोळी जाळ्यात
गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान या गुन्ह्यातील संशयितांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी सोनू सारवाणविरोधात जळगाव शहर, भुसावळ लोहमार्ग, शनीपेठ पोलिसात सात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक दीपक जगदाळे, उपनिरीक्षक संतोष पवार, एएसआय अतुल वंजारी, हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, रवींद्र कापडणे, छगन तायडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील गौरव पाटील, मिलिंद जाधव, नेत्रमचे मुबारक देशमुख, पंकज खडसे, कुंदनसिंग बयास आदींच्या पथकाने केली.