भुसावळ पालिकेतील अभिलेखा विभागातील नोंदीत फेरफार : अनुप खोब्रागडेंसह कंत्राटी कामगारांविरोधात गुन्हा
अपात्र नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंच्या आजोबांच्या नावापुढे ‘चमार’ शब्द टाकल्याचा तक्रारीत दावा : भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ
गणेश वाघ
Tampering with records in the Bhusawal Municipal Council’s records department: Case registered against Anup Khobragade and contract workers. भुसावळ (17 जुलै 2026) : जात प्रमाणपत्राअभावी अपात्र ठरलेल्या भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या आजोबांच्या नावापुढे ‘चमार’ शब्द टाकून कागदपत्रात बनावट शब्दांची भर टाकल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळातील अनुप खोब्रागडे व कंत्राटी कामगार देवेंद्र जोशींविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर दशरथ बाविस्कर (58), रा. साईहिल्स कॉलनी, खेडी रोड, भुसावळ, हे भुसावळ नगरपरिषदेत अभिलेखा विभागात 13 जानेवारी 1999 पासून नगरपरिषदेत सेवेत आहेत व सध्या असेसमेंट उतारे, बांधकाम परवानगीच्या नोंदी, जन्म-मृत्यू दाखले व इतर कागदपत्रे देण्याची जबाबदारी सांभाळतात. नगरपरिषदेतील सन 1975 पासूनचे असेसमेंट रेकॉर्ड वर्षनिहाय गठ्ठ्यांमध्ये बांधून माळ्यावर ठेवण्यात आले आहेत. 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता अनुप खोब्रागडे व देवेंद्र जोशी हे माळ्यावरून असेसमेंटचे गठ्ठे काढून रेकॉर्ड शोधत असल्याचे बाविस्कर यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना दूरध्वनीद्वारे कळविले मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुढील दोन दिवसही संबंधितांनी रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरूच ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे.


‘चमार’ शब्द लिहिला वेगळ्या हस्ताक्षरात
2 मार्च 2026 रोजी गिरीष अशोक पारधी यांनी सन 1950 पासूनच्या अॅसेसमेंट बुकाची साक्षांकित प्रत मिळण्याबाबत अर्ज दिल्यानंतर संबंधित गठ्ठे तपासताना बाविस्कर यांच्या निदर्शनास संशयास्पद बाब आली. 1975-76 तसेच सन 1980 ते 1984 या कालावधीतील नोंदीमध्ये भाग क्रमांक 3/274, मिळकत क्रमांक 1544, घरमालक गणेश प्रसाद पुदन यांच्या मालमत्तेच्या भाडेकरू नोंदीत क्रमांक 8 वर प्रेमनाथ कांता प्रसाद या नावाखाली ‘चमार’ हा अतिरिक्त शब्द वेगळ्या हस्ताक्षरात व वेगळ्या शाईने लिहिलेला आढळून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी पुन्हा मुख्याधिकार्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित रेकॉर्ड पूर्वस्थितीत ठेवण्यात आला. 1 एप्रिल 2026 रोजी कार्यालयीन आदेशानुसार त्यांनी मूळ कागदपत्रे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथे पडताळणीसाठी नेऊन त्यांची प्रत सादर केली. त्यानंतर ते 26 एप्रिल 2026 पर्यंत रजेवर गेले होते.
कागदपत्रात केले बनावट लेखन
फिर्यादीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, 27 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 या कालावधीत अनुप खोब्रागडे व देवेंद्र जोशी यांनी मिळून संबंधित रेकॉर्डमध्ये जाणून-बुजून फेरफार करून चमार हा शब्द अतिरिक्त स्वरूपात लिहिला. या कृत्यामुळे संबंधित व्यक्तीचे नुकसान होऊ शकते, हे माहिती असूनही त्यांनी शासकीय कागदपत्रात बनावट लेखन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इकबाल सैय्यद करीत आहे.
भुसावळात राजकारण पेटले : 28 च्या सुनावणीकडे लक्ष
जातप्रमाणपत्राअभावी गायत्री भंगाळे-गौर अपात्र झाल्यानंतर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. अलीकडेच सुनावणी झाल्यानंतर संबंधिताना नोटीसा बजावण्याचे आदेश झाले व आता 28 जुलै रोजी त्याची सुनावणी आहे. खंडपीठ नेमके काय आदेश देते? याकडे शहरातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अपात्र नरगाध्यक्षा भंगाळे यांच्या आजोबांच्या कागदपत्रात दोघांनी छेडछाड झाल्याचा गुन्हा आता शहर पोलिसात दाखल झाला आहे. यापूर्वी भंगाळे यांनी मुरलीधर बाविस्कर यांच्याविरोधातही प्रशासनाकडे तक्रारी करीत त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्यातच 14 जुलै रोजी प्रभारी मुख्याधिकार्यांनी अभिलेखा प्रमुख अजय मोतीराम केदारे यांच्या नावाने आदेश काढत शासकीय अभिलेखात झालेल्या कथित फेरफार प्रकरणी व अभिलेख अनधिकृतपणे कार्यालयाबाहेर नेल्याप्रकरणी कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. कायदेशीर कारवाईचा अहवाल सादर करावा, असे या आदेशात नमूद आहे.