भुसावळातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन
भुसावळ (शनिवार, 18 जुलै 2026) : शहरातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने होते. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
शाळेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, डॉ.प्रदीप साखरे, डी.के.भंगाळे, नाना पाटील, ज्योती शिरतुरे, प्रवीण चौधरी, पूनम देवकर, लक्ष्मण पवार, राजेंद्र बागुल यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अण्णाभाऊंनी मराठी साहित्यात अजरामर स्थान मिळवले
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची संधी न मिळूनही त्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्ता, जीवनानुभव आणि प्रभावी लेखनाच्या बळावर मराठी साहित्यात अजरामर स्थान मिळवले. त्यांनी समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या वेदना आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या. ते पुढे म्हणाले, विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे जीवन आपल्याला शिकवते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करता येते.
शिक्षण, समानता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.